पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची चर्चा
होर्मुझ सामुद्रधुनी मुक्त करण्यासंबंधी झाली बोलणी : अमेरिका आणि इराणशीही शांतता चर्चा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मध्यपूर्वेतील युद्ध, होर्मुझ सामुद्रधुनी आणि शांतताप्रयास यांच्या संदर्भात दूरध्वनीवरुन सविस्तर चर्चा झाली आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चर्चेची माहिती ‘एक्स’ वर प्रसारित केली. अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जियो गोर यांनीही ही चर्चा सकारात्मक पद्धतीने झाल्याचे स्पष्ट केले आहे. या चर्चेमुळे मध्यपूर्वेतील घडामोडींमध्ये भारतालाही सकारात्मक भूमिका साकारण्याची संधी प्राप्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
‘अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मला दूरध्वनी करून माझ्याशी मध्यपूर्वेतील परिस्थितीविषयी उपयुक्त आणि सकारात्मक चर्चा केली. हे युद्ध लवकरात लवकर थांबावे आणि शस्त्रसंधी व्हावी, ही भारताची भूमिका असल्याचे मी त्यांच्याकडे स्पष्ट केले. होमुझची सामुद्रधुनी ही वाहतुकीसाठी मुक्त आणि सुरक्षित असावी. ही साऱ्या जगाची आवश्यकता आहे, यावर आमचे एकमत झाले. यापुढेही या विषयावर एकमेकांच्या संपर्कात राहण्याचे आम्ही निश्चित केले आहे. चर्चा समाधानकारक प्रकारे पार पडली,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.
युद्ध लवकरच थांबणार
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध लवकरच थांबेल, अशी अपेक्षा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीन दिवसांपूर्वी व्यक्त केली आहे. इराणशी चर्चा केली जात आहे, असेही प्रतिपादन त्यांनी केले आहे. तथापि, इराणने अशी कोणतीही चर्चा झाल्याचे नाकारुन युद्ध पुढे चालविण्यास सज्ज असल्याचे स्पष्ट केल्याने पुन्हा अस्थिरता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मादी यांना अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: दूरध्वनी करणे हे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
इराणच्या नेतृत्वाशीही चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे अध्यक्ष मसौद पेझेश्कियन यांच्याशीही दूरध्वनीवरुन चर्चा केली आहे. तथापि, या चर्चेची सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. हे युद्ध थांबविण्यासाठी भारताने मध्यस्थी करण्याच्या प्रस्तावासंबंधी ही चर्चा होती काय, याविषयीही माहिती उपलब्ध झालेली नाही. मात्र, आता भारतही शांतता प्रस्थापनेसाठी सक्रिय झाला आहे, हे या घडामोडींवरुन स्पष्ट होते.
मध्यस्थीची चार देशांची इच्छा
हे युद्ध थांबविण्यासाठी मध्यस्थी करण्याची इच्छा आतापर्यंत चार देशांनी व्यक्त केली आहे. सौदी अरेबिया, तुर्किये, इजिप्त आणि पाकिस्तान हे ते चार देश आहेत. मध्यस्थीसाठी भारताचे नाव अधिकृतरित्या पुढे आले नसले, तरी भारताचीही भूमिका महत्त्वाची ठरणार, हे आता निश्चितपणे मानले जात आहे.
भारताचा भर राजकौशल्यावर
मध्यपूर्वेतील प्रश्न युद्धाने नव्हे, तर राजकौशल्यावर (डिप्लोमसी) हाताळल्यास अधिक चांगले परिणाम मिळू शकतात, अशी भारताची भूमिका आहे. युद्धकाळातही भारताने याच माध्यमातून आपल्या तेल आणि वायू वाहक नौका भारतापर्यंत येतील अशी व्यवस्था केली आहे. भारत अमेरिका, इस्रायल आणि इराण या तिन्ही देशांच्या सातत्याने संपर्कात आहे. या तिन्ही देशांशी भारताचे संबंध सौहार्दाचे आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या संदेशाद्वारे केले आहे.
नाही अनुमतीची आवश्यकता
होर्मुझची सामुद्रधुनी पार करण्यासाठी कोणाच्याही अनुमतीची आवश्यकता नसून भारताच्या वाहक नौका पोहचत आहेत. हा अनुमतीचा प्रश्न नसून सुरक्षिततेचा प्रश्न आहे. ही सामुद्रधुनी आंतरराष्ट्रीय मार्ग आहे, असे स्पष्टीकरण भारताच्या नौकावाहतूक विभागाने केले. यामुळे एक वेगळीच परिस्थिती समोर आली आहे.
शांतता प्रस्थापनेत भारताचीही भूमिका
ड युद्ध लवकर थांबण्याच्या स्थितीत, भारताचीही भूमिका अतिमहत्त्वाची
ड होर्मुझची सामुद्रधुनी मुक्त, सुरक्षित राखली जाण्यावर भारताचा कटाक्ष
ड अमेरिका, इस्रायल, इराण या तिन्ही देशांशी भारताचे सौहार्दपूर्ण संबंध
Comments are closed.