आज मणिपूरमधील पंतप्रधान मोदी

मिझोरामसह 5 राज्यांचा दौरा, प्रकल्पांचे उद्घाटन

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवारी मणिपूर राज्याला भेट देणार असून तेथे त्यांच्या हस्ते अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे. ते मणिपूरसह मिझोराम आणि अन्य तीन राज्यांचाही दौरा करणार आहेत. अशाप्रकारे 13 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत ते 5 राज्यांना भेटी देणार आहेत. एकंदर, 71 हजार 850 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे ते उद्घाटन करणार आहेत. 2023 मध्ये मणिपूरमध्ये वांशिक दंगल उसळल्यापासूनचा हा त्यांचा प्रथमच मणिपूर दौरा असल्याने त्याला मोठे महत्व प्राप्त झालेले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यात मणिपूर, मिझोराम, आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहार या पाच राज्यांचा समावेश आहे. त्यांच्या कार्यालयाने या दौऱ्याची सविस्तर माहिती दिली आहे. या माहितीनुसार ते मणिपूरमध्ये एका जाहीर सभेत भाषणही करणार आहेत. त्यांची ही सभा राज्यातील चुरचांदपूर येथे आयोजित करण्यात आली असून या सभेत ते राज्यासाठीच्या 7 हजार 300 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची घोषणा करणार आहेत. या प्रकल्पाची आधारशीला त्यांच्या हस्ते प्रस्थापित केली जाणार आहे. मणिपूरची राजधानी इंफाळ येथे ते शनिवारी दुपारी 2.30 वाजता 1,200 कोटी रुपयांच्या एका विकास प्रकल्पाचे उद्घाटनही करणार आहेत. तसेच येथे ते एका सार्वजनिक कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत. त्यानंतर ते संध्याकाळी पाच वाजता आसाममध्ये भारतरत्न डॉ. भूपेन हजारिका यांच्या 100 व्या जयंती उत्सवात सहभागी होणार आहेत.

आसामसाठी अनेक प्रकल्प

आसाममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकंदर, 18 हजार 530 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि राष्ट्रार्पण होणार आहे. या प्रकल्पांमध्ये अनेक पायाभूत विकास योजनांचा समावेश आहे. त्यानंतर ते याच राज्यातील दारांग येथे रविवारी सकाळी 11 वाजता विविध परियोजनांच्या आधारशीला स्थापन करणार आहेत. तसेच ते येथे एका सार्वजनिक समारंभात समाविष्ट होणार असून जाहीर सभेत भाषणही करतील. त्याच दिवशी दुपारी पावणेदोन वाजता ते आसाम जैविक इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन करतील, अशी माहिती देण्यात आली आहे.

15 सप्टेंबरला पश्चिम बंगालमध्ये

सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालचा दौरा करणार आहेत. सकाळी 9.30 वाजता ते कोलकाता येथे 16 व्या संयुक्त कमांड संम्मेलनात भाग घेतील. त्यानंतर ते बिहारच्या दौऱ्यावर येतील. तेथे दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी पूर्णिया येथे विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे उद्घाटन करणार आहेत, असा कार्यक्रम आहे.

आयझॉल दिल्लीशी जोडणार

आपल्या या भरगच्च कार्यक्रमांच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी मिझोरामची राजधानी आयझॉलला दिल्लीशी जोडणाऱ्या राजधानी एक्स्पे्रसचाही शुभारंभ करणार आहे. आयझॉलच्या सैरांग येथून ही रेल्वेगाडी दिल्लीच्या आनंद विहार स्थानकापर्यंत अणि तेथून परत अशी धावणार आहे. त्याचप्रमाणे ते सैरांग येथून गुवाहाटीला जाणाऱ्या गाडीलाही हिरवा कंदिल दाखविणार आहेत. तसेच सैरांग ते कोलकाता अशा रेल्वेप्रकल्पाचेही ते उद्घाटन करणार आहेत. या तीन गाड्यांमुळे आयझॉल हे शहर देशाच्या विविध महत्वाच्या शहरांशी जोडले जाणार आहे.

मणिपूर दौऱ्याची सर्वाधिक चर्चा

मणिपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी का जात नाहीत, असा प्रश्न विरोधकांकडून गेली दोन वर्षे वारंवार विचारला जात होता. केंद्र सरकारने मणिपूरला वाऱ्यावर सोडले आहे, अशी टीका विरोधी पक्षांकडून सातत्याने होत होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरला जात आहेत. त्यामुळे हा दौरा चर्चेचा विषय ठरला आहे.

Comments are closed.