पंतप्रधान मोदींनी जखमींची विचारपूस केली

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, श्रीनगर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानहून परतताच दिल्ली स्फोटात जखमी झालेल्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली आहे. दौरा आटोपून परतल्यानंतर विमानतळावरून ते थेट जयप्रकाश नारायण रुग्णालयात आले. त्यांनी जखमींना धीर दिला. तसेच डॉक्टरांचीही चर्चा केली. या स्फोटासाठी जबाबदार असणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही, या निर्धाराचा त्यांनी पुनरुच्चार केला आहे.

रुग्णालयातून परतल्यानंतर त्यांनी बुधवारी संध्याकाळी साडेपाच वाजता मंत्रिमंडळच्या सुरक्षा समितीची बैठक आयोजित केली. त्यांनी स्वत: बैठकीची अध्यक्षता स्वीकारली होती. या बैठकीला सुरक्षा समितीचे सर्व सदस्य आणि संरक्षण तसेच गृह विभागाचे महत्वाचे अधिकारी उपस्थित होते. दिल्ली स्फोटानंतरच्या स्थितीचा या बैठकी आढावा घेण्यात आला. देशभरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्याच्या योजनेवर चर्चा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीत मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना काही महत्वाच्या सूचना केल्या, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

काश्मीरमध्ये 200 स्थानी धाडी

दिल्ली स्फोटानंतर संशयितांची धरपकड : सुरक्षा यंत्रणांचे काश्मीवर लक्ष केंद्रीत

दिल्लीत झालेल्या भीषण स्फोटाच्या संदर्भात सोमवारी जम्मू-काश्मीरमध्ये व्यापक कार्यवाही करण्यात येत आहे. या स्फोटाचे सूत्रधारी काश्मीरमधील पुलवामा येथील आहेत, हे स्पष्ट झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी काश्मीरवर लक्ष केंद्रीत केले आहे. मंगळवार रात्रीपासून काश्मीरमधील अनेक स्थानी धाडसत्राचा प्रारंभ करण्यात आला आहे. बुधवारी संध्याकाळपर्यंत 200 स्थानी धाडी घालण्यात आल्या असून शेकडो संशयितांची धरपकड करण्यात आली आहे. पुलवामा, श्रीनगर, कुलगाम, बडगाम आदी स्थानी एनआयए आणि स्थानिक पोलिसांनी धाडी घालून महत्वाची साधनसामग्री हस्तगत केल्याची माहिती आहे. पकडलेल्यांची कसून चौकशी केली जात असून स्फोटाच्या सूत्रधारांपर्यंत पोहचण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

मातापित्यांचे डीएनए परीक्षण होणार

कारस्फोटात आत्मघात करून घेतलेल्या दहशतवाद्यांच्या माता-पित्यांचे डीएनए परीक्षण करण्याचा निर्णय दिल्ली पोलिसांनी घेतला आहे. डीएनए विश्लेषणातून आत्मघाती दहशतवाद्याची ओळख पटणार आहे. डॉ. उमर नबी भट याच्या आईच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. हा या स्फोटाचा प्रमुख सूत्रधार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. स्फोट झालेल्या कारमध्ये तो होता. कारमधील स्फोटके पोलिसांच्या हाती लागू नयेत. म्हणून अन्यत्र नेण्याची त्याची योजना होती. मात्र, स्फोटके कारमधून नेत असताना स्फोटके हाताळण्यात त्याच्या हातून चूक झाली आणि तेथेच स्फोट झाला, असे तपासात आढळून आले आहे.

प्रजासत्ताकदिनी होणार होता हल्ला

दहशतवाद्यांची प्रारंभीची योजना प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर हल्ला करण्याची होती. त्यासाठी मोठ्या प्रमाणात स्फोटके जमा करण्यात आली होती. या स्फोटकांचे बाँब्ज करुन ते ठिकठिकाणी पेरुन ठेवण्याचे कारस्थान शिजविण्यात आले होते. प्रजासत्ताकदिनी संचलनाच्या कार्यक्रमाच्या वेळी स्फोट मालिका घडवून आणली जाणार होती. शेकडो लोकांना ठार करून समाजात भीती पसरविण्याचा त्यांचा हेतू होता. तथापि, पोलिसांना आणि गुप्तचरांना याचा वेळीच सुगावा लागल्याने त्यांनी गेल्या शनिवारी आणि रविवारी पाच राज्यांमध्ये धडक करवाई करुन दहशतवाद्यांची योजना उद्ध्वस्त केली. 3000 किलोहून अधिक स्फोटके, एके 47 रायफल्स, शेकडो गोळ्या आणि इतर साधनसामग्री जप्त करण्यात आली. त्यामुळे प्रजासत्ताक दिनी स्फोटमालिका घडविण्याचा डाव उधळाला गेला.

लाल किल्ला परिसराची पाहणी

मुख्य सूत्रधार मोहम्मद उमर नबी याचा साथीदार डॉ. मुझम्मील यांनी गेले दोन महिने लाल किल्ला परिसरावर दृष्टी ठेवली होती. या काळात त्याने अनेकदा या परिसराची पाहणी केली. स्फोट घडविण्यासाठी योग्य स्थानांचा तो शोध घेत होता. मुझम्मील हा हरियाणातील फरिदाबाद येथील अल् फताह विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक आहे. गेल्या जानेवारी पासून ही हल्ल्याची योजना आकार घेत होती, अशीही माहिती पोलासांना प्राप्त झाली आहे. ही माहिती आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या दहशवाद्यांकडून दिली गेली आहे, असे एनआयएच्या सूत्रांचे म्हणणे आहे. यासंबंधी पुढील अन्वेषण करण्यात येत आहे.

अमोनियम नायट्रेटचा उपयोग

एनआयएच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची कसून पाहणी केली असून रक्त आणि अन्य वस्तूचे 40 नमुने संकलित करण्यात आले आहेत. या नमुन्यांच्या तपासणीवरुन स्फोटात अमोनियम नायट्रेट या ज्वालाग्रही पदार्थाचा उपयोग केला गेल्याची बाब उघड झाली आहे. मात्र, त्याहीपेक्षा विनाशकारी अशा आणखी एका स्फोटक उपयोगात आणण्यात आले आहे. त्याचा तपास होत आहे.

मौलवी इष्तियाक याला अटक

देशात स्फोटमालिका घडविण्याचे कारस्थान रचणाऱ्या सात डॉक्टरांना कट्टर इस्लामकडे वळविणारा धर्मप्रसाकर मौलवी इष्तियाक याला अटक करण्यात आली आहे. त्याला हरियाणाच्या मेवात येथून अटक करण्यात आली. त्याच्याकडून चौकशीत बरीच माहिती हाती लागल्याचा दावा सूत्रांकडून दिली जात आहे. त्याची चौकशी श्रीनगर येथे केली जात आहे. तो अल् फताह विद्यापीठाच्या परिसरातच एका भाड्याच्या घरात रहात होता. तेथेच त्याचा या डॉक्टरांची संपर्क झाला.

दहशतवाद्यांच्या भरतीचा कार्यक्रम

मौलवी इष्तियाक याने सहा ते सात डॉक्टरांच्या मनात इस्लामी कट्टरता वाद निर्माण केला. त्यांना दहशतवादी बनण्यास प्रेरणा दिली. त्यानंतर त्याने हरियाणाच्या बाहेर अन्य राज्यांमध्येही आपली पाळेमुळे पसरविण्याचा प्रयत्न चालविला होता. अनेक राज्यांमधून मुस्लीम युवकांना दहशतवादी बनवून त्यांना आपल्या दहशतवादी कार्यांसाठी उपयोगात आणण्याचा त्याचा विचार होता.

अल् फताह विद्यापीठ दहशतवादाचे केंद्र

या कारस्थानात असलेले सर्व डॉक्टर्स अल फताह विद्यापीठाचेच आहेत. फरिदाबाद येथे हे विद्यापीठ आहे. डॉ. शाहीन ही महिला दहशतवादी याच विद्यापीठातून डॉक्टर झाली आहे. हे विद्यापीठ स्फोट मालिका कारस्थानाचा केंद्रबिंदू ठरत आहे. त्यामुळे या विद्यापीठावर लक्ष्य केंद्रीत करण्यात आले आहे. विद्यापीठात कशाप्रकारे प्राधापकांची नियुक्ती केली जाते, ते तपासले जात आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापनाने मात्र हे सर्व आरोप नाकारले असून विद्यापीठाचा दहशतवादाशी कोणत्याही प्रकारे संबंध नसल्याचा दावा या विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी केला.

उमरला काढले होते कामावरुन

या स्फोट प्रकरणाचा सूत्रधार डॉ. मोहम्मद नबी उमर हा काही काळापूर्वी जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथील रुग्णालयात डॉक्टर म्हणून सेवा बजावीत होता. त्याच्या चुकीमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने त्याला कामावरुन कमी करण्यात आले होते. त्यानंतर त्याने अल् फताह विद्यापीठात प्राध्यापकारची नोकरी पत्करली होती, अशी माहिती प्राप्त झाली आहे. तो नोकरी करत असताना त्याच्यासंबंधी सहकारी डॉक्टरांनी आणि अनेक रुग्णांनी त्याच्या वर्तणुकीसंदर्भात आणि कामचुकारपणाच्या संदर्भात तक्रारी केल्या होत्या. अशा डॉक्टरला विद्यापीठाने नेमले कसे, याचीही चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती आहे.

तपास वेगाने केला जाणार

या स्फोट प्रकरणाचा तपास वेगाने करुन मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहचण्याची एनआयएची योजना आहे. त्यासाठी एनआयएने विविध पथकांची स्थापना केली आहे. या प्रकरणातील संशयितांचे संबंध जैश ए मोहम्मद या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनेशी आहेत, ही बाब आतापर्यंतच्या तपासात स्पष्ट झाली आहे. त्या अनुषंगाने पुढील तपास केले जात आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

मुख्य सूत्रधारापर्यंत पोहचणार

ड एनआयएचे वेगाने तपासकार्य, मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहचण्याचे प्रयत्न

ड हरियाणातल्या अल् फताह विद्यापीठातील घडामोडींवर बारकाईने लक्ष

ड 26 जानेवारीला महाउत्पात घडविण्याची होती दहशतवाद्यांची योजना

Comments are closed.