पंतप्रधान मोदी नक्कीच महान नेते आहेत.
काँग्रेसचे नेते शशी थरुर यांच्याकडून पुन्हा प्रशंसा
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद मोदी हे निश्चितच महान नेते असून त्यांचा विकासवादी दृष्टीकोन वाखाणण्यासारखा आहे, अशी प्रशंसा काँग्रेस नेते शशी थरुर यांनी केली आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे सहाव्या रामनाथ गोयंका स्मृती कार्यक्रमात भाषण केले. त्या भाषणावर थरुर प्रतिक्रिया व्यक्त करीत होते. भारत आज विकासाठी आतुर आहे. तसेच तो वसाहतवादी गुलामगिरीच्या मानसिकतेतूनही बाहेर पडू इच्छित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात या दोन्ही बाबींचे प्रतिबिंब स्पष्टपणे दिसून येते. भारताकडे आता इतर देशांनी केवळ एक ‘उगवती बाजारपेठ’ म्हणून बघता कामा नये. तर एक उगवता आदर्श म्हणून पाहिले पाहिजे, ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मांडणी प्रशंसनीय आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ निवडणुकांचा विचार करत नाहीत. कित्येकदा ते निवडणुकीत काय परिणाम होईल, याचा बाऊ न करता, धाडसी निर्णय घेतात. त्यांना भारताच्या विकासाची आस आहे. पण विकास साधताना भारताचे स्वत्व आणि भारताची पारंपरिक संस्कृती संवर्धित झाली पाहिजे, असाही त्यांचा आग्रह आहे. या दोन्ही बाबी त्यांना एका निराळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. आज खरेतर माझी प्रकृती बरी नव्हती. मला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत आहे. तथापि, मी त्यांच्या व्याख्यानाला श्रोता म्हणून उपस्थित राहिलो, याचा मला आनंद होत आहे, अशा शब्दांमध्ये शशी थरुर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महत्व विशद केले.
पंतप्रधान मोदी भावनेच्या मोडमध्ये
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी निवडणुकीच्या मन:स्थितीत असतात, असे त्यांचे विरोधक म्हणतात. तथापि, आज व्याख्यान देताना ते निवडणुकीच्या नव्हे, तर भावनात्मक मानसिकतेत होते. त्यांनी भारताला येत्या दहा वर्षांमध्ये गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त होण्याची दिलेली प्रतिज्ञा महत्वाची आहे. देशाची प्रगती केवळ आर्थिक होऊन चालत नाही. त्याचे स्वत्वही संवर्धित झाले पाहिजे, ही त्यांची भूमिका आहे. ती योग्य आहे. त्यांची देशासंबंधीची भावना ही शुद्ध असून ती प्रत्येकाने आचरणात आणावी, अशीही भलावण शशी थरुर यांनी केली आहे.
Comments are closed.