पंतप्रधान मोदी आता 'सेवातीर्थ'वर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यालय आता नव्या वास्तूत स्थानांतरीत होणार आहे. या वास्तूचे नामकरण ‘सेवा तीर्थ’ असे करण्यात आले आहे. हे एक ऐतिहासिक स्थानांतरण ठरणार आहे. गेली 78 वर्षे हे कार्यालय ‘साऊथ ब्लॉक’ मध्येच निवासस्थानी होते. तथापि, आता ते अत्याधुनिक अशा नव्या संकुलात नेले जाणार आहे. केंद्रीय विस्ता पुनर्विस्तार प्रकल्पाच्या अंतर्गत हे स्थलांतरण होईल.
हा प्रकल्प आता पूर्ण झाला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयासह अनेक केंद्र सरकारी कार्यालये नव्या वास्तूत नेली जाणार आहेत. या कार्यालयांच्या वास्तूंची नावेही नवी आहेत. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांचे राज्यपाल आणि उपराज्यपाल यांच्या अधिकृत निवासस्थानांचे नावही आता ‘राजभवन’ न राहता ‘लोकभवन’ होणार आहे. नुकताच केंद्र सरकारने तसा आदेश लागू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यालय नव्या वास्तूच्या ‘सेवा तीर्थ-1’ या भागात स्थानांतरीत होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
अन्य कार्यालये नजीकच
‘सेवा तीर्थ-2’, ‘सेवा तीर्थ-3’ या वास्तू नजीकच असून त्यांच्यात अनुक्रमे केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवालय तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचे कार्यालय असेल. ही कार्यालये नव्या वास्तूंमध्ये नेण्यासाठी सर्व सज्जता करण्यात येत आहे. राजधानी दिल्लीत त्यामुळे जोरदार हालचाली केल्या जात असून येत्या काही दिवसांमध्येच ह sस्थानांतर पूर्ण होईल. नवी कार्यालये अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहेत.
कर्तव्य इमारत
‘एकत्रित सामायिक केंद्रीय सचिवालय’ हे नव्या वास्तूचे वैशिट्या आहे. या वास्तूला ‘कर्तव्य भवन’ हे नाव देण्यात आले आहे. सर्व केंद्रीय विभागांची कार्यालये एकमेकांच्या जवळ असावीत आणि एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात चालत जाता येणे शक्य व्हावे, अशा प्रकारे या नव्या संकुलाची रचना करण्यात आली आहे. सध्या ही कार्यालये एकमेकांपासून दूर असणाऱ्या शास्त्री भवन, निर्माण भवन, कृषी भवन अशा भिन्न भिन्न वास्तूंमध्ये आहेत.
आधीच्या वास्तूंचे काय होणार…
सर्व केंद्रीय विभागांची कार्यालये नव्या वास्तू संकुलात स्थानांतरीत करण्यात आल्यानंतर आधीच्या वास्तूंचे काय होणार, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. या वास्तू पाडल्या जाणार नाहीत. त्यांच्यात भारताच्या विषयीची वस्तूसंग्रहालये स्थापन करण्यात येणार आहेत. या संग्रहालयाचे नामकरण ‘युगायुगीन भारत संग्रहालय’ असे केले जाईल, अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे.
Comments are closed.