पंतप्रधान मोदींचा लालु प्रसादवर हल्ला

बिहारमधील कार्यक्रमात किसान सन्मान निधीचे वाटप, सभेत महाकुंभमेळ्याचे महत्त्व केले विशद

वृत्तसंस्था / भागलपूर

ज्यांनी बिहारमध्ये ‘जंगलराज’ माजविले, ते आज हिंदूंच्या श्रद्धा आणि विश्वासाची चेष्टा करीत आहेत, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. बिहारमध्ये भागलपूर येथे एका प्रचंड जाहीर सभेत ते भाषण करीत होते. याच सभेत त्यांनी देशभरातील शेतकऱ्यांना ‘किसान सन्मान निधी’च्या 19 व्या हप्त्याचे वितरण केले. प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या बँक खात्यात त्यांनी 2 हजार रुपयांची रक्कम डिजिटल पद्धतीने जमा केली. या सभेला मोठा प्रतिसाद लाभला. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि इतर नेतेही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने केलेल्या जनहिताच्या कामांचा आढावा घेतला. तसेच भारताची संस्कृती आणि परंपरा जपण्याच्या कार्यात केंद्र सरकारच्या योगदानाचीही प्रशंसा केली. सध्या उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळा होत आहे. या महोत्सवात देशातील 50 कोटींहून अधिक भाविकांनी सहभाग घेत पवित्र स्नान केले आहे. तथापि, हिंदू धर्म, संस्कृती आणि भारताची उच्च परंपरा यांचा द्वेष करणाऱ्यांनी महाकुंभमेळ्यासंबंधी अपशब्द उच्चारुन भारताचा अपमान केला आहे. ज्यांनी बिहारला जंगलराज आणि अनागोंदी याखेरीज अन्य काही दिले नाही, असे लोक आज या महाकुंभमेळ्यासंबंधी अश्लाघ्य भाषा करुन, आपल्या द्वेषपूर्ण मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहे, अशी घणाघाती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

भाविकांच्या संख्येचा विक्रम

सांप्रतच्या काळात होत असलेल्या महाकुंभ सोहळ्यात भाविकांच्या संख्येचा विक्रम झाला. संपूर्ण युरोपच्या लोकसंख्येपेक्षाही अधिक संख्येने भाविक या महोत्सवात सहभागी झाले आहेत. तरीही अनेक असंतुष्ट आत्मे या पर्वणीला विरोध करुन बहुसंख्याकांच्या भावनांचा अवमान करीत आहेत. अशा लोकांना बिहार कधीही क्षमा करणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी या जाहीर सभेत केले.

काय म्हणाले होते यादव

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यांनी या महाकुंभमेळ्यासंबंधी काही दिवसांपूर्वी टीका केली होती. हा कुंभमेळा ‘निरर्थक’ आहे, असे उद्गार त्यांनी तेथे काही दिवसांपूर्वी घडलेल्या चेंगराचेंगरीच्या संदर्भात काढले होते. दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीसंबंधीही त्यांनी अशीच टीका केली होती. हिंदूंच्या महोत्सवावर अशी टीका करुन लालू प्रसाद यादव आपली अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाची नीती पुढे चालवित आहेत, असे प्रत्युत्तर भारतीय जनता पक्षाने दिले होते. लालू प्रसाद यादव यांच्या टीकेमुळे मोठा राजकीय वाद पेटला आहे.

अनेक विरोधी नेत्यांची टीका

महाकुंभमेळ्यावर अनेक विरोधी पक्ष नेत्यांनी तोंडसुख घेतले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्याचा उल्लेख मृत्यूकुंभ असा केला होता. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी, हा उत्सव पैशाचा अपव्यय करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला आहे, अशी टीका केली होती. महाकुंभ असा कोणताही प्रकार नसतो. महाकुंभ शब्द  आदित्यनाथ सरकारने शोधून काढला आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली होती.

योजना शेतकऱ्यांना लाभदायक

किसान सन्मान निधी ही केंद्र सरकारची योजना शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय ठरली आहे. या योजनेचे 19 हप्ते आजपर्यंत शेतकऱ्यांच्या नावे जमा करण्यात आले आहेत. या अंतर्गत केंद्र सरकारकडून प्रत्येक वर्षी तीन हप्त्यांमध्ये एकंदर 6 हजार रुपये दिले जातात. सोमवारी 22 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.

Comments are closed.