पंतप्रधान मोदींचे 'सेवातीर्थ' कार्यरत आहे

पीएमओच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन, प्रथम निर्णय महिला हितासाठी

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवे कार्यालय ‘सेवा तीर्थ’चे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले आहे. हा कार्यक्रम शुक्रवारी आयोजित करण्यात आला. हे नवे कार्यालय केंद्र सरकारकडून साकारण्यात आलेल्या नव्या प्रशासकीय संकुलात आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर प्रथमच या कार्यालयाच्या स्थानात परिवर्तन करण्यात आले असून हे नवे कार्यालय अत्याधुनिक आणि सर्व सोयीसुविधांनी युक्त अशा प्रकारचे आहे.

या नूतन कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 100 रुपयांच्या नव्या नाण्याचाही प्रारंभ केला. शुक्रवारी दुपारी हा उद्घाटन सोहळा साजरा करण्यात आला. ‘सेवा तीर्थ’ समवेत ‘कर्तव्य भवन’चेही उद्घाटन करण्यात आले आहे. या उद्घाटन सोहळ्यापूर्वी दुपारी 2 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांच्या कार्यालयाच्या या नव्या वास्तूला ‘सेवा तीर्थ’ हे नाव देण्यात आले. या प्रशासकीय संकुलाचे दोन भाग असून भाग क्रमांक 1 मध्ये ‘सेवा तीर्थ’ तर भाग क्रमांक दोन मध्ये केंद्र सरकारच्या विविध विभागांची कार्यालये आहेत. भाग क्रमांक दोनचे नाव ‘कर्तव्य भवन’ असे ठेवण्यात आले आहे. देशाचे प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख, लोककेंद्री, आधुनिक आणि तत्पर बनविण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ध्येय आहे. या ध्येयाला अनुसरुन हे संकुल निर्माण करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्र सरकारकडून उद्घाटन कार्यक्रमात देण्यात आली.

प्रथम निर्णय महिला-शेतकरी हिताचा

नव्या कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्वरित या कार्यालयातून कामाचा शुभारंभ केला आहे. या कार्यालयात त्यांनी घेतलेला प्रथम निर्णय महिला, शेतकरी आणि युवक यांच्या हिताचा आहे. तसेच अन्य सामाजिक निर्णयही घेण्यात आले आहेत. ‘लखपती लडकी’ या लोकप्रिय योजनेची व्याप्ती दुप्पट करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानुसार मार्च 2029 पर्यंत ‘लखपती लडकी’ची संख्या 6 कोटी केली जाणार आहे. सध्या ही संख्या तीन कोटींपेक्षा अधिक आहे. कृषी क्षेत्रासाठी पायाभूत सुविधा निर्माणकार्यासाठी राखीव असणाऱ्या निधीत 1 लाख कोटीवरून 2 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. कृषी उत्पादनांसाठी मूल्यसाखळी स्थापन करण्याकरिता हा निधी देण्यात आला. तसेच ‘स्टार्टअप इंडिया’ निधीमध्ये 10 हजार कोटी रुपयांची भर घालण्यात आली. या निधीचा उपयोग अत्याधुनिक तंत्रज्ञान विकास, नव्या उद्योगांची स्थापना आणि आधुनिक वस्तू उत्पादन यांच्यासाठी करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.

नव्या संकुलाची आवश्यकता का…

स्वातंत्र्यानंतर प्रथमच केंद्र सरकारच्या सर्व विभागांच्या कार्यालयांचे स्थलांतर नव्या प्रशासकीय संकुलात होणार आहे. आतापर्यंत अनेक दशके केंद्र सरकारच्या विभागांची कार्यालये जुनाट, गैरसोयीच्या आणि विविध स्थानी विखुरलेल्या वास्तूंमध्ये होती. त्यामुळे विविध विभागांमध्ये ताळमेळ आणि संपर्क ठेवणे त्रासाचे होत होते. एका विभागातून दुसऱ्या विभागात जाणेही कालापव्यय करणारे आणि अवघड होते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयासह सर्व विभागांची कार्यालये एका संकुलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार हे नवे प्रशासकीय संकुल निर्माण करण्यात आले आहे. हे संकुल अत्याधुनिक आणि भविष्यवेळी पद्धतीने निर्माण करण्यात आले आहे, असे प्रतिपादन केंद्राकडून करण्यात आले.

‘सेवा तीर्थ’ मध्ये कोणती कार्यालये…

‘सेवा तीर्थ’ या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यालय (सेवा तीर्थ-1), राष्ट्रीय सुरक्षा मंडळ सचिवालय (सेवातीर्थ-2) आणि केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवालय (सेवा तीर्थ-3) अशी तीन महत्त्वाची कार्यालये आहेत. याआधीच्या काळात ही तिन्ही कार्यालये एकमेकांपासून दूर असलेल्या भिन्न भिन्न वास्तूंमध्ये होती. त्यामुळे लोकांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाया जात होता, आता हा कालापव्य टळणार आहे.

‘कर्तव्य भवन’मध्ये कोणती कार्यालये…

याच प्रशासकीय संकुलाच्या द्वितीय भागात ‘कर्तव्य भवन’चे निर्माणकार्य करण्यात आले आहे. या वास्तूच्या कर्तव्य भवन-1 मध्ये अर्थविभाग, संरक्षणविभाग, आरोग्य आणि कुटुंबकल्याण विभाग. सहकार विभाग, शिक्षण विभाग, सांस्कृतिक विभाग, कायदा आणि न्याय विभाग, माहिती आणि प्रसारण विभाग, कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, रसायन आणि खत विभाग तसेच वनवासी कल्याण विभाग आदी विभागांची कार्यालये असतील. कर्तव्य भवन-2 मध्येही अन्य केंद्र सरकारी प्रशासकीय विभागांची कार्यालये स्थापित केली आहेत.

नव्या कार्यालयातले प्रथम चार निर्णय…

  1. ‘लखपती दिदीं’ची संख्या 3 कोटींवरून 6 कोटींवर नेण्याचा निर्णय
  2. कृषी क्षेत्रासाठी पायाभूत सुविधांसाठीची रक्कम करण्यात आली दुप्पट
  3. ‘स्टार्टअप’साठी निधीत आणखी 10 हजार कोटींची केली जाणार वाढ
  4. अपघातग्रस्तांठी नवी विनामूल्य उपचार योजना, मर्यादा 1.5 लाख रुपये

 

Comments are closed.