पंतप्रधान मोदी यांच्या चीनच्या दौर्यावर पुष्टी झाली
चीनचे मंत्री यी, भारताचे डोभाल यांची व्यापक चर्चा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) चीनमध्ये होणाऱ्या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित राहणार आहेत, हे आता निश्चित झाले आहे. भारताच्या दौऱ्यावर असलेले चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वांग यी आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या विस्तृत चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला निश्चित स्वरुप देण्यात आले आहे. भारत आणि चीन आता एकमेकांच्या अधिक जवळ येत असून त्यांच्यात सकारात्मक सहकार्य निर्माण होऊ शकते, असे वक्तव्य अजित डोभाल यांनी या चर्चेनंतर केले आहे.
भारत आणि चीन यांच्या सीमेवर सध्या शांतता आहे. तसेच दोन्ही देशांमधील परस्पर चर्चा आणि संवाद सकारात्मक पद्धतीने होत आहे. या सौहार्दाचे प्रतीक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शांघाय सहकार्य संघटनेच्या चीनमधील परिषदेला उपस्थित राहणार आहेत. वांग यी आणि माझ्यात मंगळवारी झालेली चर्चा अत्यंत महत्वाची आणि व्यापक होती. ती दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी उपयुक्त ठरु शकते, असे प्रतिपादन डोभाल यांनी या चर्चेनंतर केले.
वांग यी यांचा दुजोरा
डोभाल यांच्या म्हणण्याला वांग यी यांनीही दुजोरा दिला आहे. काही महिन्यांपूर्वी रशियातील कझान येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष जिगपिंग यांच्यात चर्चा झाली होती. या चर्चेमुळे भारत आणि चीन यांच्यात उत्कट सहकार्य करण्यासाठीची दिशा प्राप्त झाली आहे. गेल्या काही कालावधीत दोन्ही देशांमध्ये जे संघर्ष निर्माण झाले आहेत, ते दोन्ही देशांच्या हिताचे नाहीत. असे संघर्ष निर्माण होऊन नयेत यासाठी विश्वासाच्या वातावरणाची निर्मिती होत आहे. दोन्ही देशांमध्ये सहकार्य वाढविण्यासाठी निश्चित लक्ष्ये ठरवून त्यांच्यावर काम होत आहे. सहकार्याचे प्रारुप निश्चित करण्याची आवश्यकता आहे. दोन्ही देशांना एकमेकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे, असे वक्तव्य वांग यी यांनी केले.
सीमावादाचा संदर्भ
भारत आणि चीन यांच्यात अनेक दशकांपासून सीमावाद आहे. दोन्ही देशांमधींल सीमा निश्चित नसल्याने गोंधळ निर्माण होत आहे. या वादाचा संदर्भही डोभाल आणि वांग यी यांच्या चर्चेत देण्यात आला आहे. सध्या दोन्ही देशांचे प्रत्येकी 50 ते 60 हजार सैनिक लडाख सीमेवर आहेत. 2020 मध्ये लडाखमध्ये सीमासंघर्ष उद्भवला होता. तो जवळपास चार वर्षे चालला. नंतर तो निवळला असून आता दोन्ही देशांच्या सेना त्यांच्या मूळ स्थितीत परत गेल्या आहेत.
दहशतवाद प्रमुख मुद्दा
पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद हा प्रमुख मुद्दा असून या चर्चेत भारताकडून त्याच्याकडे चीनचे लक्ष वेधण्यात आले आहे. चीनने प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे पाकिस्तानच्या दहशतवादाकडे आजवर दुर्लक्ष केले आहे. तसेच संयुक्त राष्ट्र संघात दहशतवादासंबंधी प्रस्तावांवरील चर्चेच्या वेळेला पाकिस्तानची पाठराखण केली आहे. दहशतवाद हा साऱ्या जगासाठी धोका असून जगातील सर्व देशांनी त्याच्याविरोधात संयुक्तरित्या आघाडी उघडली पाहिजे. कोणत्याही कारणास्तव किंवा कोणतेही निमित्त सांगून दहशतवादाकडे दुर्लक्ष करता कामा नये, ही भारताची प्रदीर्घ काळापासूनची भूमिका आहे. या चर्चेत चीनकडेही हा मुद्दा मांडण्यात आला.
सावधपणा आवश्यक
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या व्यापार शुल्क धोरणामुळे भारत आणि अमेरिका यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. मात्र, भारताने चीनशी सहकार्याचा हात पुढे करताना सावधपणा दाखविला पाहिजे. भारत आणि चीन यांच्यातील संबंध सुधारत असले तरी इतिहास विसरता कामा नये, असे तज्ञांचे मत आहे.
Comments are closed.