पंतप्रधान मोदींचा एकता नगर दौरा

सरदार पटेल जयंतीनिमित्त अनेक प्रकल्पांचा आरंभ

वृत्तसंस्था, एकता नगर (गुजरात)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे पोलादी पुरुष म्हणून प्रख्यात असणारे दिवंगत नेते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 151 व्या जन्मदिनानिमित्त गुजरातमधील एकता नगरला भेट दिली आहे. 31 ऑक्टोबर हा सरदार पटेलांचा जन्मदिन आहे. या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकता नगर येथे 400 कोटी रुपये गुंतवणुकीच्या अनेक पर्यटक सुविधान प्रकल्पांचा शुभारंभ केला आहे.

एकता नगरमध्येच सरदार वल्लभभार्ग पटेलांचा भव्य पुतळा आहे. या भागात पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक प्रकल्पांची योजना केंद्र सरकारने केली आहे. त्यांच्यात पायाभूत सुविधा, पर्यटक सुविधा आणि नागरी सुविधा अशा प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांमध्ये एकता नगरमध्ये साकारत असलेल्या वर्षावनाच्या संवर्धनाचाही प्रकल्प समाविष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी या भव्य प्रकल्पाला भेट देऊन तेथील कार्याच्या प्रगतीची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली.

सरदार पटेलांना अभिवादन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळीच एकता नगर येथे स्थापित सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळ्याला वंदन करुन अभिवादन केले. सरदार पटेल यांच्या 151 व्या जन्मदिनानिमित्त त्यांनी या पुतळ्याच्या चरणांवर पुष्पार्पण करुन पटेलांच्या प्रती असणारा आपला आदर व्यक्त केला. पटेलांचा जन्मदिन साऱ्या देशात राष्ट्रीय एकदा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. एकता नगर येथे शनिवारी ‘एकता संचलना“चेही आयोजन करण्यात आले. या संचलनात गुजरातच्या विविध पोलिस दलांच्या सदस्यांनी भाग घेतला, शिस्त, धैर्य आणि व्यावसायिकता यांचे प्रत्यंतर आणून देण्यासाठी प्रत्येक वर्षी या दिवशी संचलनाचे आयोजन होते.

नक्षलमुक्त भारताचे दर्शन

सरदार पटेल यांच्या 151 व्या जन्मदिनानिमित्त एकता नगर येथे एका रंगमंच सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले. या सादरीकरणाचे नामकरण ‘नक्षलमुक्त भारत“ असे करण्यात आले. हे सादरीकरण राष्ट्रीय नाट्या प्रशाला या देशविख्यात संस्थेकडून करण्यात आले. या सादरीकरणात भारताच्या 126 जिल्ह्यांमधून निवडलेल्या निष्णात 2 सहस्र कलाकारांचा आणि नाट्याकर्मींचा समावेश होता. या कार्यक्रमात इतर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचाही समावेश करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संपूर्ण वेळ या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांनी समाविष्ट कलाकारांच्या निपुणतेचे आणि कार्यक्रमाच्या आयोजनाचे कौतुक केले.

Comments are closed.