वरळी ते कफ परेड भुयारी मेट्रो सेवेचे आज लोकार्पण; पंतप्रधान मोदी नवी मुंबईतून ‘ऑनलाईन’ झेंडा दाखवणार

पश्चिम उपनगर आणि दक्षिण मुंबईची ‘कनेक्टिव्हीटी’ अधिक वेगवान करणाऱ्या भुयारी मेट्रोच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. त्याच सोहळय़ाच्या व्यासपीठावरून ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भुयारी मेट्रो सेवेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्यांचे हस्ते लोकार्पण झाल्यानंतर कफ परेड आणि वरळी सायन्स म्युझियम स्थानकातून एकाचवेळी दोन स्वतंत्र मेट्रो धावणार आहेत.

भुयारी मेट्रोच्या (ऍक्वा लाईन) वरळी सायन्स म्युझियम ते कफ परेड या अंतिम टप्प्याचे उद्घाटन बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा टप्पा खुला झाल्यानंतर आरे ते कफ परेडदरम्यानची संपूर्ण भुयारी मेट्रो मार्गिका मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. भुयारी मेट्रोच्या अंतिम टप्प्यात 11 स्थानके आहेत. त्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हुतात्मा चौक, चर्चगेट, विधान भवन अशा महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश आहे. त्यामुळे मुंबईकरांना या मार्गावरील आरामदायी आणि वातानुकूलित प्रवासाची प्रतीक्षा आहे. बुधवारी अंतिम टप्प्याचे उद्घाटन केले जाईल आणि गुरुवारपासून या मार्गावर प्रवासी सेवा सुरू होईल, असे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे (एमएमआरसीएल) सांगण्यात आले आहे.

सकाळी 5.55 ते रात्री  10.30 पर्यंत मेट्रो धावणार

दक्षिण मुंबईतील पहिली मेट्रो सेवा असलेल्या ‘ऍक्वा लाईन’ला मुंबईकरांचा मोठा प्रतिसाद मिळण्याची मेट्रो प्रशासनाला अपेक्षा आहे. त्यादृष्टीने प्रशासन प्रवासी सेवेसाठी सज्ज झाले आहे. गुरुवारपासून आरे जेव्हीएलआर ते कफ परेड या संपूर्ण मार्गिकेवर सकाळी 5.55 वाजल्यापासून रात्री 10.30 वाजेपर्यंत मेट्रो सेवा सुरु राहणार आहे. पीक अवर्सला दर 5 मिनिटे 3 सेकंदाने मेट्रो धावणार आहे. या मार्गावरील किमान तिकीट 10 रुपये तर कमाल तिकीट 70 रुपयांचे असेल. प्रवाशांना आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंतचा संपूर्ण प्रवास 70 रुपयांत करता येणार आहे.

Comments are closed.