पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवा विक्रम केला आहे.

सर्वाधिक काळ ‘सरकार प्रमुख’ राहणारे देशातील पहिलेच नेते : इंदिरा गांधींनंतर आता चामलिंगांनाही टाकले पिछाडीवर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी एक ऐतिहासिक टप्पा गाठत विक्रमाला गवसणी घातली. त्यांनी सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांचा विक्रम मागे टाकत भारतातील सर्वात जास्त काळ सत्तेत राहिलेले सरकारप्रमुख होण्याचा मान मिळवला आहे. पवन कुमार चामलिंग यांनी मुख्यमंत्री म्हणून 8,930 दिवस काम केले होते, तर नरेंद्र मोदी यांनी आता 8,931 दिवस पूर्ण केले आहेत. यात गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून केलेला कार्यकाळ तसेच पंतप्रधानपदाचा समावेश आहे. नरेंद्र मोदी यांचा हा विक्रम भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचा क्षण मानला जात आहे.

पंतप्रधान मोदींनी यापूर्वी गुजरातचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. तसेच ते सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणारे नेतेही आहेत. स्वातंत्र्यानंतर जन्मलेले ते पहिले पंतप्रधान असून त्यांनी 2014, 2019 आणि 2024 च्या सलग तीन लोकसभा निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाला विजय मिळवून दिला आहे. नरेंद्र मोदी यांच्या या नव्या विक्रमी वाटचालीवर भाजपने आनंद व्यक्त करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत भाजपने नरेंद्र मोदी यांच्या रूपाने भारताला केवळ एक ‘पंतप्रधान’च नव्हे, तर एक ‘प्रधान सेवक’ लाभला आहे, असे ट्विट केले आहे.

गेल्या ऑक्टोबरमध्ये सरकार प्रमुख म्हणून आपल्या 25 व्या वर्षात पदार्पण करताना पंतप्रधानांनी भारताच्या जनतेचे आभार मानले होते. 2001 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यापासूनच्या आपल्या प्रवासावर भाष्य करताना पंतप्रधान म्हणाले की, लोकांचे जीवनमान सुधारणे आणि देशाच्या प्रगतीत योगदान देणे हा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहिला आहे. त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत पदभार स्वीकारला होता. गुजरात विनाशकारी भूकंप, महाचक्रीवादळ, दीर्घकाळचा दुष्काळ आणि राजकीय अस्थिरतेचा सामना करत असताना मोदींनी सत्तेची सूत्रे हाती घेतली होती.

पंतप्रधान म्हणूनही मोठी कामगिरी

नरेंद्र मोदी हे सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणारे दुसरे नेते आहेत. त्यांनी इंदिरा गांधी यांचा 4,077 दिवसांचा कार्यकाळ मागे टाकला आहे. 22 मार्च 2026 पर्यंत मोदींनी पंतप्रधान म्हणून 4,318 दिवस सेवा बजावली आहे. तथापि, सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवण्याचा विक्रम अजूनही जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर आहे. त्यांनी 6,126 दिवस हे पद भूषवले होते. हा विक्रम मोडण्यासाठी मोदींना 2029 नंतरही पंतप्रधानपदी राहावे लागेल.

राजकीय पटलावर मोदींची मोठी झेप

गुजरातमधील वडनगर येथे एका साध्या कुटुंबात जन्मलेल्या मोदी यांनी लहानपणी आपल्या वडिलांना रेल्वे स्थानकावर चहा विकण्यात मदत केली. त्यानंतर त्यांनी आरएसएस आणि पुढे भारतीय जनता पक्षामधून आपली राजकीय वाटचाल सुरू ठेवत उंच भरारी घेतली. सामान्य लोकांशी असलेला त्यांचा जवळचा संपर्क आणि प्रभावी संवादशैली यासाठी ओळखले जाणारे मोदी यांनी एक दशकाहून अधिक काळ गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी भाजपला ऐतिहासिक राष्ट्रीय विजय मिळवून देत देशाच्या नेतृत्वाची सूत्रे हाती घेतली. नरेंद्र मोदी यांनी नेहरू यांच्याप्रमाणेच आपल्या पक्षाला सलग तीन लोकसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवून दिला आहे. तसेच त्यांनी स्वत:ला एक महत्त्वाचे जागतिक नेते म्हणून प्रस्थापित केले असून भारताला जागतिक पटलावर एक आत्मविश्वासपूर्ण आणि ठाम आवाज म्हणून सादर केले आहे.

पवन कुमार चामलिंग यांची कामगिरी

पवन कुमार चामलिंग हे भारतातील सिक्कीम राज्यात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले व्यक्ती आहेत. त्यांचा कार्यकाळ 12 डिसेंबर 1994 ते 26 मे 2019 पर्यंत म्हणजेच 24 वर्षांहून अधिक होता. त्यांनी पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांचा विक्रम मोडला होता. आपल्या कार्यकाळात चामलिंग यांनी सिक्कीमला 100 टक्के सेंद्रिय राज्य बनवले आणि शिक्षण, आरोग्य व पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केली होती.

Comments are closed.