पंतप्रधानांनी कच्चीव्यू प्रकरणात हस्तक्षेप केला पाहिजे

तामिळनाडू मुख्यमंत्री स्टॅलिन यांची मागणी : भाजपकडून प्रत्युत्तर

वृत्तसंस्था/चेन्नई

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी कच्चातिवू बेट विषयक वादात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हस्तक्षेप करावा, असा आग्रह केला आहे. श्रीलंकेच्या तुरुंगांमध्ये कैद भारतीय मच्छिमार आणि जप्त नौकांची मुक्तता करविण्याची मागणीही त्यांनी केली आहे. तर स्टॅलिन यांच्या या मागणीवर भाजपने प्रत्युत्तर दिले. 1974 मध्ये केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना आणि तामिळनाडूत द्रमुक सत्तेवर असताना कच्चातिवु बेट श्रीलंकेला सोपविण्यात आले हेते, अशी आठवण भाजप प्रवक्ते नारायण तिरुपति यांनी करून दिली आहे. तर आता कच्चातिवु बेटाच्या मुद्द्यावरून तामिळनाडूतील राजकारण तापले आहे. 2026 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हा मोठा मुद्दा ठरू शकतो.

केंद्र सरकार मागील 10 वर्षांमध्ये तामिळनाडूच्या मच्छिमारांचे रक्षण करण्यास अपयशी ठरले आहे. भाजप सरकार कच्चातिवु मुद्द्यावर केवळ राजकारण करत असून कुठलेच ठोस पाऊल उचलत नाही. केवळ पंतप्रधान मोदींच्या हस्तक्षेपाद्वारेच तामिळनाडूच्या मच्छिमारांसाठी स्थायी तोडगा निघू शकतो असे स्टॅलिन यांनी म्हटले आहे. श्रीलंकेच्या अलिकडच्या दाव्यांना विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी का फेटाळले नाही, असा प्रश्नही स्टॅलिन यांनी उपस्थित केला.

श्रीलंकेच्या मंत्र्याचे वक्तव्त

मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी श्रीलंकेचे मत्स्यमंत्री डग्लस देवानंद यांच्या वक्तव्याचा उल्लेख केला. तामिळनाडूचे मच्छिमार अनेकदा श्रीलंकेच्या सागरी हद्दीत शिरतात, श्रीलंका कच्चातिवु बेट भारताला परत करणार नसल्याचे देवानंद यांनी म्हटले होते. देवानंद यांच्या या दाव्याप्रकरणी केंद्र सरकार मौन बाळगून असल्याचा आरोप स्टॅलिन यांनी केला. तामिळनाडू विधानसभेने यापूर्वीच कच्चातिवू परत मिळविण्याच्या मागणीचा प्रस्ताव संमत केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर अनेकदा हा मुद्दा मी उपस्थित केला आहे. तामिळनाडूचे द्रमुक सरकार कच्चातिवु बेट परत मिळविण्याचे प्रयत्न जारी ठेवणार असल्याचे स्टॅलिन म्हणाले.

भाजपकडून द्रमुक लक्ष्य

1974 मध्ये केंद्रात काँग्रेस सरकार असताना द्रमुकने कच्चातिवु बेट श्रीलंकेला देण्याच्या निर्णयालो संमती दिली होती.  14 वर्षांपर्यंत काँग्रेससोबत केंद्रात सत्तेवर असताना द्रमुकने काहीच केले नाही. तर केंद्रातील भाजप सरकारने श्रीलंकेच्या नौदलाकडुन गोळीबार होणार नाही हे सुनिश्चित केले आहे. तर काँग्रेस केंद्रात सत्तेवर असताना सुमारे 1 हजार मच्छिमार मारले गेले होते.  तर वर्तमान भाजप सरकारने एका मच्छिमाराला मृत्युदंडाच्या शिक्षेपासूनही वाचविले असल्याचे म्हणत भाजप प्रवक्ते नारायण तिरुपति यांनी स्टॅलिन यांच्या दाव्यांवर प्रत्युत्तर दिले आहे.

मच्छिमारांचा मुद्दा तापला

मोदी सरकारने प्रभावित श्रीलंकन तमिळ मच्छिमार आणि भारतीय तमिळ मच्छिमारांदरम्यान अनेक फेऱ्यांमध्ये चर्चा घडवून आणली आहे. जोपर्यंत समोरील बाजूशी चर्चा होणार नाही आणि कुठलाही तोडगा निघणार नाही, तोपर्यंत ही समस्या संपणार नाही. याप्रकरणी केंद्र सरकार योग्य पावले उचलत असल्याचे भाजप प्रवक्ते नारायण तिरुपति यांनी म्हटले आहे. श्रीलंकेकडून जप्त करण्यात आलेल्या नौकांचा लिलाव केला जात असल्याने भारतीय मच्छिमारांची उपजीविका संकटात सापडली असून या नौका परत मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Comments are closed.