पंतप्रधानांचा आज मुख्यमंत्र्यांशी संवाद
पश्चिम आशियातील परिस्थितीवर चर्चा होणार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरातील संकट अधिक गडद होत आहे. देशातील लोकांमध्येही भीतीचे वातावरण पसरत आहे. तथापि, सरकारने चिंता न करण्याचे आणि परिस्थिती नियंत्रणात असल्याचे आवाहन केले आहे. याचदरम्यान आता पंतप्रधान मोदी शुक्रवार, 27 मार्च रोजी संध्याकाळी पश्चिम आशियामध्ये (मध्य पूर्व) सुरू असलेल्या युद्धासंदर्भात सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुख्यमंत्र्यांसोबतचा हा संवाद सायंकाळी 6:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होईल. या बैठकीत राज्यांच्या तयारीचा आणि योजनांचा आढावा घेतला जाईल. आचारसंहितेच्या अंमलबजावणीमुळे निवडणूक असलेल्या राज्यांचा या बैठकीत समावेश होणार नाही. या राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत कॅबिनेट सचिवालयामार्फत स्वतंत्र बैठका घेण्यात येतील. ‘टीम इंडिया’च्या भावनेने सर्व प्रयत्नांमध्ये समन्वय साधणे हा या बैठकीचा उद्देश आहे.
सध्या देशात गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेल यांच्या टंचाईबाबत बऱ्याच समस्या निर्माण झालेल्या दिसत आहेत. केंद्र सरकारकडून सध्या इंधन आणि गॅसचा पुरेसा साठा असल्याचा दावा केला जात असला तरी राज्यांमध्ये गॅस आणि इंधन टंचाईची समस्या जाणवत आहे. लोक साठेबाजी करत असल्याचा आणि अफवा पसरवल्या जात असल्यामुळे या समस्या निर्माण झाल्याचा युक्तिवाद सरकारकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात सर्वसामान्य लोकांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. या आव्हानांबाबत आणि राज्यांच्या अन्य सूचनांचा विचार पंतप्रधानांसोबत होणाऱ्या बैठकीत केला जाणार आहे.
Comments are closed.