थायलंडच्या स्लिपिंग प्रिंसेसचे निधन, गेल्या तीन वर्षांपासून होत्या कोमात

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

जगातील सर्वात श्रीमंत राजांमध्ये गणना होणारे राजे महा वजिरालोंगकोर्न यांच्या सर्वात मोठ्या कन्या आणि देशातील अत्यंत लोकप्रिय राजकुमारी बज्रकीतीआभा देब्यावती (Bajrakitiyabha) यांचे वयाच्या ४७ व्या वर्षी निधन झाले आहे. त्या गेल्या तीन वर्षांपासून कोमामध्ये होत्या. अखेर 11 जून रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

शाही घराण्याकडून १२ जून २०२६, शुक्रवार रोजी अधिकृत निवेदन जारी करून त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. दिलेल्या माहितीनुसार, राजकुमारी बज्रकीतियाभा यांनी गुरुवार, ११ जूनच्या संध्याकाळी बँकॉक येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

‘स्लीपिंग प्रिंसेस’ म्हणून ओळख

राजकुमारी बज्रकीतियाभा गेल्या तीन वर्षांपासून कोमात होत्या आणि त्यांना ‘लाइफ सपोर्ट सिस्टीम’वर ठेवण्यात आले होते. यामुळे त्यांना ‘स्लीपिंग प्रिंसेस’ म्हणूनही ओळखले जाऊ लागले होते. ‘प्रिन्सेस भा’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या राजकुमारी डिसेंबर २०२२ आपल्या कुत्र्यांना प्रशिक्षण देत असताना अचानक बेशुद्ध पडल्या होत्या. सुरुवातीला राजवाड्याकडून सांगण्यात आले होते की, त्यांना ‘मायकोप्लाज्मा इन्फेक्शन’ (Mycoplasma infection – एक प्रकारचा जिवाणू संसर्ग) झाला आहे.

शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राजकुमारी पोटाच्या संसर्गाशी (abdominal infection) लढत होत्या आणि त्यांची प्रकृती सातत्याने खालावत चालली होती. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही अखेर त्यांच्या किडनी आणि फुफ्फुसांनी काम करणे बंद केले, ज्यामुळे गुरुवारी संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

15 दिवसांचा अधिकृत शोक जाहीर

राजकुमारी बजराकितियाभा यांच्या निधनानंतर थायलंडच्या मंत्रिमंडळाने 15 दिवसांचा अधिकृत राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे. या काळात देशभरातील सर्व सरकारी इमारती आणि शाळांवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शाही निवेदनानुसार, राजकुमारींचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी बँकॉकच्या प्रसिद्ध ‘ग्रँड पॅलेस’ मध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यांचा अंतिम संस्कार शाही परंपरांनुसार पूर्ण राजकीय सन्मानाने केला जाईल.

Comments are closed.