पृथ्वीची खेळी द्विशतकी मोलाची

हिंदुस्थानचा आक्रमक सलामीवीर पृथ्वी शॉने रणजी करंडकात आपल्या दमदार पुनरागमनाची घोषणा केली आहे. सोमवारी चंदिगडमध्ये महाराष्ट्राकडून खेळताना शॉने केवळ 141 चेंडूंत द्विशतक ठोकत रणजी ट्रॉफी एलिट गटातील दुसरे सर्वात जलद द्विशतक झळकावले.

पहिल्या डावात फक्त आठ धावांवर बाद झाल्यानंतर दुसऱया डावात शॉने तडाखेबंद खेळी करत चंदिगडविरुद्ध सेक्टर 16 स्टेडियमवर महाराष्ट्राला भक्कम स्थितीत नेले. त्याने 72 चेंडूंत शतक पूर्ण केले ज्यात 13 चौकारांचा समावेश होता. हे रणजी ट्रॉफी इतिहासातील सहावे सर्वात जलद शतक ठरले. त्यानंतर त्याने आणखी 54 चेंडूंत 80 धावा जोडल्या आणि अखेर 141 चेंडूंत शानदार द्विशतक गाठले. शॉचे हे द्विशतक रणजी ट्रॉफी एलिट किंवा झोनल स्तरावरचे दुसरे सर्वात जलद द्विशतक आहे. या यादीत फक्त रवी शास्त्राr (1984-85 सत्रात बडोद्याविरुद्ध मुंबईकडून 123 चेंडूंत द्विशतक) शॉच्या पुढे आहेत. पहिल्या श्रेणीतील (फर्स्ट-क्लास) सामन्यांमध्ये भारतीय खेळाडूंकडून सर्वात जलद द्विशतकाचा विक्रम तन्मय अग्रवालच्या (हैदराबाद) नावावर आहे – त्याने जानेवारी 2024 मध्ये फक्त 119 चेंडूंत हे यश मिळवले होते.

2018 मध्ये अंडर-19 विश्वचषक विजेत्या हिंदुस्थान संघाचा कर्णधार राहिलेला शॉ आजवर 59 फर्स्ट-क्लास सामन्यांत 45.85 च्या सरासरीने 4631 धावा काढल्या आहेत, ज्यात 13 शतकं आणि 19 अर्धशतकं समाविष्ट आहेत. त्याचा सर्वोच्च धावसंख्या विक्रम 379 धावा इतका आहे. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये त्याने 3399 धावा, तर टी-20 सामन्यांत 2902 धावा झळकावल्या आहेत. या स्पह्टक खेळीने पृथ्वी शॉने पुन्हा एकदा दाखवून दिले की तो हिंदुस्थानच्या सलामी स्थानासाठी अजूनही एक गंभीर दावेदार आहे.

Comments are closed.