IPL Auction: मेहनत करूनही पदरी निराशा! धावा करूनही पृथ्वी शॉ आयपीएल लिलावात दुर्लक्षित
पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) आयपीएलच्या मिनी ऑक्शनकडून खूप अपेक्षा होत्या, पण पहिल्या फेरीत तो अनसोल्ड राहिला. त्याची मूळ किंमत (Base Price) 75 लाख रुपये ठेवण्यात आली होती, पण इतकी कमी किंमत असूनही सुरुवातीच्या टप्प्यात एकाही संघाने त्याच्यावर बोली लावली नाही. साहजिकच यामुळे पृथ्वी शॉ खूप निराश झाला असेल.
मागच्या आयपीएल हंगामातही पृथ्वी शॉला कोणी विकत घेतले नव्हते. त्याच्या जुन्या टीमने, म्हणजेच ‘दिल्ली कॅपिटल्स’ने त्याला रिटेन केले नाही आणि दुसऱ्या कोणत्याही संघाने त्याला पसंती दिली नाही. यानंतर त्याने स्वतःवर खूप मेहनत घेतली. त्याने आपले वाढलेले वजन कमी केले आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये (Domestic Cricket) आपली कामगिरी सुधारली. मात्र, तरीही आयपीएल लिलावाच्या पहिल्या टप्प्यात त्याला याचा फायदा झाला नाही.
2023 मध्ये पृथ्वी शॉ आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सपना गिल यांच्यातील वादाचे प्रकरण समोर आले होते. मुंबईतील एका हॉटेलबाहेर दोघांमध्ये झालेली बाचाबाची आणि धक्काबुक्कीचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. सपना गिलने पृथ्वीवर छेडछाड आणि मारहाणीचे आरोप केले होते, तर पृथ्वीच्या मित्राने सांगितले की, हे प्रकरण जबरदस्ती सेल्फी घेण्यावरून आणि त्रास देण्यावरून सुरू झाले होते. या प्रकरणामुळे पोलिसात तक्रार झाली आणि बराच काळ हा वाद चर्चेत राहिला, ज्याचा परिणाम पृथ्वीच्या प्रतिमेवर झाला.
पृथ्वी शॉने आतापर्यंत आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी एकूण 79 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 23.95 च्या सरासरीने आणि 147.47 च्या स्ट्राईक रेटने 1892 धावा केल्या आहेत. त्याने 238 चौकार आणि 61 षटकारांच्या मदतीने 14 अर्धशतके ठोकली असून 99 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
Comments are closed.