आता 'या' संघातून खेळताना दिसणार पृथ्वी शॉ…! CSK च्या स्टार खेळाडूलाही मिळाले संघात स्थान

पृथ्वी शॉ: मागील काही काळापासून भारतीय संघात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत असलेला पृथ्वी शॉ आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईऐवजी महाराष्ट्राच्या संघातून खेळताना दिसणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शानदार पदार्पण केल्यानंतर, खराब फॉर्म आणि फिटनेसमुळे शॉला भारतीय संघातून वगळण्यात आले होते. तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याची बॅट शांत राहिली. आता आगामी देशांतर्गत हंगामातील अखिल भारतीय बुची बाबू आमंत्रण स्पर्धेसाठी (Buchi Babu All India Invitation Tournament) महाराष्ट्राच्या जाहीर झालेल्या संघात पृथ्वी शॉचा समावेश आहे. (Prithvi Shaw Maharashtra team)

बुची बाबू स्पर्धेसाठी महाराष्ट्राने आपला 17 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या संघात पृथ्वी शॉ व्यतिरिक्त चेन्नई सुपर किंग्सचा स्टार खेळाडू ऋतुराज गायकवाडलाही स्थान मिळाले आहे. पण, गायकवाड आणि यष्टीरक्षक सौरभ नवले या दोघांनाही एक सामना खेळल्यानंतर दुलिप ट्रॉफीसाठी बंगळुरूमधील पश्चिम विभागाच्या संघात सामील व्हावे लागणार आहे. महाराष्ट्राने संघाची कर्णधारपदाची जबाबदारी अंकित बावनेकडे सोपवली आहे, ज्यात मुकेश चौधरी आणि राजवर्धन हंगरगेकर यांच्या नावाचाही समावेश आहे. बुची बाबू स्पर्धेची सुरुवात 18 ऑगस्टपासून होणार असून, फायनल सामना 9 सप्टेंबर रोजी खेळला जाईल. हे सर्व सामने चेन्नईत होतील.

बुची बाबू स्पर्धा 2025 साठी महाराष्ट्राचा संघ (महाराष्ट्र क्रिकेट संघ पथक 2025)- अंकित बावने (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, पृथ्वी शॉ, सिद्धेश वीर, सचिन धस, अर्शिन कुलकर्णी, हर्षल काटे, सिद्धार्थ म्हात्रे, सौरभ नवाले, मंदार भंडारी, रामकृष्ण घोष, मुकेश चौधरी, प्रदीप दाधे, विक्की ओस्तवाल, हितेश वाळुंज, प्रशांत सोळंकी, राजवर्धन हांगरगेकर

यावेळी बुची बाबू स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होतील, ज्यांना प्रत्येकी 4 संघांच्या ग्रुपमध्ये विभागले आहे. महाराष्ट्राच्या संघाला ग्रुप-ए मध्ये टीएनसीए प्रेसिडेंट इलेव्हन, हिमाचल प्रदेश आणि छत्तीसगडसोबत स्थान मिळाले आहे. महाराष्ट्राचा संघ आपला पहिला सामना 18 ऑगस्टपासून छत्तीसगडविरुद्ध खेळेल. बुची बाबू स्पर्धेच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण टीएनसीएच्या यूट्यूब चॅनेलवर केले जाईल. (Buchi Babu tournament)

Comments are closed.