प्रिवान इलेव्हन युवा चषकाचा विजेता, परळच्या कामगार मैदानात टेनिस क्रिकेटची फटकेबाजी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शिवसेना नेते आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त परळच्या कामगार मैदानात गुलाबी चेंडूत रंगलेल्या युवासेना चषक क्रिकेट स्पर्धेत नायगावच्या प्रिवान इलेव्हनने शिवडी लॉरेन्स संघाचा आठ विकेट राखून पराभव करत बाजी मारली.

युवासेना सहसचिव मुकेश कोळी यांच्या आयोजनाखाली रंगलेल्या या स्पर्धेच्या 13 व्या पर्वात शिवडी विधानसभेतील 8 आणि मुंबईतील असे आठ संघ भिडले. दोन्ही गटातून प्रिवान आणि लॉरेन्स संघाने अव्वल स्थान पटकावत जेतेपदाच्या लढतीत झेप घेतली. या लढतीत शिवडी लॉरेन्सचे 32 धावांचे आव्हान प्रिवान इलेव्हनने 8 विकेट आणि 3 चेंडू राखून सहज गाठले. या धमाकेदार स्पर्धेचा विजेता एक लाख रुपयांचा मानकरी ठरला. सूर्या नायडूने मालिकावीराचा मान मिळवला तर निखिल जाधव सर्वोत्तम फलंदाज तर मयंक मांगेला सर्वोत्तम गोलंदाज ठरला.

विजेत्यांना शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत आणि शिवसेना सचिव सुधीर साळवी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेला मनसे नेते बाळा नांदगावकर, आमदार अजय चौधरी, आमदार मनोज जामसुतकर, आमदार सुनिल शिंदे, शिवसेना उपनेते अमोल कीर्तीकर, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, तसेच भारती पेडणेकर, सचिन पडव, माधुरी मांजरेकर या नगरसेवकांसह श्वेता राणे, लता रहाटे, वैभवी चव्हाण, माधुरी घाडीगावकर, शाखाप्रमुख मिनार नाटळकर, रमेश रावल आणि शिवसेना-युवासेनेचे पदाधिकारी यांचीही उपस्थिती लाभली. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी साई गणेश स्पोर्ट्स क्लब, अभिजीत गमरे, महेश चौहान, अनिकेत बोस, निखिल साळसकर यांनी मेहनत घेतली.

Comments are closed.