गोरेगाव मेट्रो स्टेशनखाली बस पेटली, धुराचे लोळ स्टेशनमध्ये पसरल्याने घबराट, गोंधळ आणि पळापळ

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पश्चिम द्रुतगती महामार्गावर गोरेगाव येथे मेट्रो स्टेशनखाली खासगी बसला भीषण आग लागल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. आगीचा काही क्षणांतच भडका उडाल्याने धुराचे मोठे लोळ स्थानकात गेल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. अनेक प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास वाटू लागला. गोंधळ आणि पळापळ झाली. महामार्गावर वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या अंधेरीपर्यंत रांगा लागल्या. सुदैवाने आगीच्या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. अग्निशमन दलाच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली.

महादेव ट्रव्हलची टुरिस्ट बस मुंबईहून गुजरातला चालली होती. गोरेगाव परिसरात बस पोहोचली असतानाच अचानक शॉर्ट सर्किट झाले आणि आतील प्रवासी व चालक गोंधळून गेले. चालकाने तत्परता दाखवत बस थांबवली आणि बसमधील सर्व सात प्रवासी सुखरूप बाहेर पडले. पुढच्या काही क्षणांतच बसने पूर्णपणे पेट घेतला. भीषण आगीत बस जळून खाक झाली. सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच वनराई पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीचे नियंत्रण केले, तर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आगीच्या धुराचे मोठे लोट वरच्या भागातील आरे मेट्रो स्थानक परिसरात पोहोचले. त्यामुळे मेट्रो स्थानकातील प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली. प्रवाशांनी प्लॅटफॉर्म परिसरातून बाहेर पडत सुरक्षित ठिकाण गाठले. यात प्रवाशांची पळापळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी वा कोणालाही दुखापत झाली नाही. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Comments are closed.