मुंबईत गृहनिर्माण क्षेत्रात खासगी गुंतवणूक वाढली, नाईट फ्रँकचा अहवाल

मुंबईत या वर्षी निवासी घरांच्या निर्मितीत सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांची खासगी क्षेत्राद्वारे गुंतवणूक करण्यात आली आहे. मुंबई परिसरात वेअर हाऊस उभारणीत सर्वाधिक म्हणजे 13 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. या खालोखाल बंगळुरू, दिल्ली, हैदराबाद, पुणे आणि चेन्नईचा क्रमांक लागतो. गृहनिर्माण क्षेत्रातील ‘नाईट फ्रँक’ या कंपनीने याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. दरम्यान, भविष्यात गृहनिर्माण क्षेत्रात खासगी गुंतवणूक आणखी वाढण्याची शक्यताही अहवालात वर्तवण्यात आली आहे.

देशातील प्रमुख शहरांतील गृहनिर्मिती क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत खासगी गुंतवणुकीत 32 टक्के वाढ झाली आहे. यंदाच्या वर्षांत निवासी घरांच्या निर्मितीतील खासगी गुंतवणूक दुपटीने वाढली आहे. 2017 मध्ये व्यावसायिक कार्यालयाच्या निर्मितीत सर्वाधिक खासगी गुंतवणूक नोंदवली गेली होती. त्या तुलनेत आता निवासी गृहनिर्मितीत खासगी गुंतवणूकदार रस घेत असल्याचेही या अहवालात नमूद आहे. प्रामुख्याने संयुक्त अरब अमिरात, सिंगापूर येथील वैयक्तिक तसेच संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मुंबईतील गृहनिर्मितीत रस दाखवला आहे. निवासी क्षेत्राबरोबरच वेअर हाऊसमध्ये मोठी गुंतवणूक करण्यात आल्याचेही अहवालात म्हटले आहे. व्यावसायिक कार्यालयांच्या निर्मितीतील गुंतवणुकीत बंगळुरू आघाडीवर आहे. त्या पाठोपाठ हैदराबाद, दिल्ली आणि मग मुंबईचा क्रमांक लागतो.

Comments are closed.