साखरपा येथे खाजगी प्रवासी ट्रॅव्हल्स जळून खाक, प्रवाशांना वेळीच बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जाधववाडीजवळ गद्रे पेट्रोल पंपासमोर खाजगी प्रवासी ट्रॅव्हल्स जळून खाक झाली. मात्र सुदैवाने मोठा अनर्थ टळला.
याबाबत सविस्तर मिळालेल्या माहिती नुसार गोविंद धोंडीराम साळुंखे (35)राहणार लातूर हे आपल्या ताब्यातील प्रवासी ट्रॅव्हल्स ही गाडी पुणे येथून गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तीस प्रवाशांना घेऊन पुण्याहून रत्नागिरीकडे निघाले होते. सदर प्रवासी बस साखरपा येथे आली असताना आज शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजता संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जाधववाडी येथील गद्रे पेट्रोल पंपा समोर गाडीने पेट घेतल्याचे चालकाच्या निदर्शनास आली असता प्रसंगावधान राखून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
केवळ दैव बलत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला. सर्व तीस प्रवासी सुखरूप असून कोणतीही जीवित हानी नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी नक्की कारण स्पष्ट झाले नाही.अग्निशमन दलाच्या गाडीने आग विझवण्यात यश आले असले तरी आगीत गाडी पूर्णतः भस्मसात झाली असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच साखरपा दूरक्षेत्राचे पोलीस उप निरीक्षक प्रमोद वाघाटे, सहाय्यक पोलीस फौजदार शांताराम पंदेरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनस्वी पावसकर, चालक तानाजी पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक दुसऱ्या बाजूने वळवून प्रवाशांना सहकार्य केले.
Comments are closed.