गाझा, इस्त्राईलचा प्रतिसाद प्रियांका वड्राचे पोस्ट
लाजिरवाणे तुमचे वक्तव्य, आम्ही हमासचे दहशतवादी मारले
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
गाझामध्ये इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झालाआहे. इस्रायलच्या सैन्याने पूर्ण गाझावर नियंत्रण मिळविण्याची योजना आखली असून यामुळे जागतिक स्तरावर वाद वाढला आहे. याचदरम्यान काँग्रेस खासदार प्रियांका वड्रा यांनी इस्रायलवर 60 हजारांहुन अधिक लोकांच्या हत्येचा गंभीर आरोप केला आहे. तर प्रियांका वड्रा यांच्या या वक्तव्यानंतर इस्रायलने देखील शाब्दिक प्रत्युत्तर देत आरोप खोडून काढला आहे.
इस्रायल नरसंहार करत आहे, इस्रायलने 60 हजारांहून अधिक लोकांना मारले असून यात 18,430 मुलांचा समावेश आहे. शेकडो लोकांना अन्नावाचून मरण्यासाठी भाग पाडण्यात आले असून यात अनेक मुले सामील आहेत आणि आता लाखो लोकांना उपासमारीने मारण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप प्रियांका वड्रा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत केला आहे. या गुन्ह्यांना मौन आणि निष्क्रीयतेद्वारे सक्षम करणे देखील एक गुन्हा आहे. भारत सरकार याप्रकरणी गप्प असून हे लाजिरवाणे आहे असेही त्यांनी नमूद केले आहे.
इस्रायलने सुनावले
भारतातील इस्रायलचे राजदूत रेवुएन अजार यांनी प्रियांका वड्रा यांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले. प्रियांका वड्रा यांचे वक्तव्य चुकीचे आहे. इस्रायलने 25 हजार हमास दहशतवाद्यांना मारले आहे. मानवी जीवनात झालेली सर्वात मोठी हानी, हमासच्या क्रूर रणनीतिंचा परिणाम आहे, नागरिकांचा ढालीसारखा वापर, मदत तसेच बचाव करणाऱ्यांवर गोळीबार करणे आणि रॉकेट डागणे असे प्रकार हमासने केले असल्याचे अजार यांनी सुनावले आहे. इस्रायलने गाझामध्ये 20 लाख टन अन्नसामग्री पाठविली परंतु हमासने ती जप्त करण्याचा प्रयत्न केला, यामुळे उपासमारीची स्थिती निर्माण झाली. गाझाची लोकसंख्या मागील 50 वर्षांमध्ये 450 टक्क्यांनी वाढली आहे, यामुळे तेथे नरसंहाराचा कुठलाच प्रश्न उद्भवत नाही, हमासच्या आकडेवारीवर विश्वास ठेवू नका असे अजार यांनी प्रियांका वड्रा यांना सुनावले आहे. गाझायुद्धावरून हे वाक्युद्ध दोन्ही बाजूंदरम्यान खोल वैचारिक आणि राजकीय दरी दर्शविणारे आहे. एकीकडे प्रियांका वड्रा या कथित स्वरुपात मानवतेविरोधी अपराध आणि नरसंहार ठरवत आहेत, तर दुसरीकडे आम्ही हमासच्या दहशतवादाच्या विरोधात लढत आहोत आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रयत्नशील असल्याचा इस्रायलचा दावा आहे.
Comments are closed.