CSK vs PBKS: प्रभसिमरन, श्रेयस अय्यर नाही तर 'या' खेळाडूने जिंकला सामनावीर पुरस्कार

आयपीएल 2026 च्या सातव्या सामन्यात, पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जवर 5 गडी राखून शानदार विजय मिळवला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली, पंजाबने आपला सलग दुसरा विजय नोंदवला आणि त्यासह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 210 धावांचे एक विशाल लक्ष्य पंजाबसमोर ठेवले होते; मात्र, चेपॉकच्या मैदानावर खेळताना पंजाबने हे लक्ष्य अवघ्या 18.4 षटकांतच गाठले.

या विजयात श्रेयस अय्यरने अर्धशतकी खेळी साकारून महत्त्वाची भूमिका बजावली, तर प्रभसिमरन सिंगने 43 धावांचे योगदान दिले. तथापि, या सामन्याचा खरा नायक ठरला तो प्रियांश आर्य. अवघ्या 11 चेंडूंमध्ये 39 धावांची स्फोटक खेळी साकारून त्याने सामनावीर (Player of the Match) पुरस्कार पटकावला.

210 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबला एका धडाकेबाज सुरुवातीची गरज होती आणि प्रियांश आर्यने नेमकी तशीच सुरुवात करून दिली. 3 चौकार आणि 4 षटकारांच्या जोरावर, त्याने केवळ 11 चेंडूंमध्ये 39 धावा कुटल्या. प्रियांश आणि प्रभसिमरन यांनी अवघ्या 4.2 षटकांतच पहिल्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी रचून, संघाच्या विजयाचा भक्कम पाया रचला.

या कामगिरीसह, प्रियांश आर्य हा आयपीएलच्या इतिहासातील असा पराक्रम करणारा केवळ दुसरा खेळाडू ठरला. ज्याने अत्यंत कमी चेंडूंचा सामना करूनही, केवळ आपल्या फलंदाजीच्या जोरावर सामनावीर पुरस्कार मिळवला. यापूर्वी, 2023 मध्ये ग्लेन फिलिप्सने राजस्थान रॉयल्सविरुद्ध 7 चेंडूंमध्ये 25 धावा काढून हा विक्रम प्रस्थापित केला होता.

सामन्यानंतर आपल्या खेळाबद्दल बोलताना प्रियांश आर्य म्हणाला, ‘मी नेहमी टीमच्या फायद्यासाठी आक्रमक खेळतो, थोडा रिस्क घेतो. स्वतःवर पूर्ण विश्वास आहे. पहिल्या चेंडूवर मारता येत असेल तर मी मारतो. आयपीएलमध्ये फरक जाणवतो, पण आत्मविश्वास मदत करते. मी रोज दोन सत्रात सराव करतो कारण मला बॅटिंग खूप आवडते.’

Comments are closed.