राष्ट्रीय क्रीडा दिनी विशाखापट्टणममध्ये प्रो कबड्डी लीगच्या 12व्या हंगामाचा शुभारंभ

प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील 12 (Pro kabaddi League Season 12) व्या हंगामाला 29 ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. या हंगामाची सुरूवात विशाखापट्टणम येथून होणार आहे. या स्पर्धेचा शुभारंभ भारताच्या राष्ट्रीय क्रीडा दिनी होणार आहे. सात वर्षांनंतर प्रो कबड्डी लीग स्पर्धा या शहरात परतली आहे. हा हंगाम आतापर्यंतचा सर्वात रोमाचंक आणि आक्रमक ठरणार आहे.

या हंगामाची सुरूवात तेलुगू टायटन्स आणि तमिळ थलायवाज यांच्यात होणाऱ्या सामन्याने होणार आहे. हा सामना तेलुगू टायटन्सच्या घरच्या मैदानावर होणार आहे. तर पहिल्या दिवसातील दुसऱ्या लढतीत बेंगळुरू बुल्सचा सामना पुणेरी पलटन संघाविरूद्ध होणार आहे. हे दोन्ही सामने विशाखापट्टणममधील विश्वनाथ स्पोर्ट्स क्लब येथे पार पडणार आहेत.

आगामी हंगामाची दमदार सुरूवात करण्यासाठी वरूण बीचवरील नोवोटेल येथे भव्य दिव्य असा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला मशाल स्पोर्ट्सचे बिझनेस हेड आणि प्रो कबड्डी लीग स्पर्धेचे चेअरमन अनुपम गोस्वामी उपस्थित होते. तसेच तेलुगू टायटन्स संघाचा कर्णधार विजय मलिक, तमिळ थलायवाज संघाचा कर्णधार पवन सेहरावत तसेच उर्वरीत 10 संघांचे कर्णधार देखील उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना मशाल स्पोर्ट्सचे बिझनेस हेड आणि प्रो कबड्डी लीग स्पर्धेचे चेअरमन अनुपम गोस्वामी म्हणाले की, आम्ही प्रो कबड्डी लीग स्पर्धेचा आणखी एक हंगाम घेऊन परतलो आहोत याचा आम्हाला आनंद आहे. यावेळी स्पर्धेचं स्वरूप वेगळं आहे, जे चाहत्यांना खेळाकडे आकर्षित करण्यासाठी तयार करण्यात आलं आहे. या हंगामातील प्रत्येक सामना हा अतिशय महत्वाचा असणार आहे. त्यामुळे या हंगामाची तीव्रता आणखी वाढणार आहे. मुख्य म्हणजे, खूप दिवसांपासून ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहिली जात होती, लीगचे विशाखापट्टणममध्ये पुनरागमन होत आहे. त्याचबरोबर उद्या आपण राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करणार आहोत आणि या दिवशी दिग्गज खेळाडूंना गौरवून स्पर्धेला सुरूवात करणं खूपच रोमांचक आहे.

तसेच तेलुगू टायटन्सस संघाचा कर्णधार विजय मलिक म्हणाला की, स्पर्धेतील 10 वा हंगाम अधिक आव्हानात्मक असणार आहे. प्रत्येक संघाने आपला संघ आणखी मजबूत केला आहे. खेळाडू म्हणून आम्हाला चांगलं माहित आहे की, प्रत्येक सामन्यात आमची चांगलीच कसोटी लागणार आहे. हाच या हंगामाला आणखी रोमांचक बनवणारा घटक आहे. या हंगामात कुठलाही सामना सोपा नसेल, प्रत्येक सामन्यात विजयासाठी झुंज द्यावी लागेल.

तमिळ थलायवाज संघाचा कर्णधार पवन सेहरावत म्हणाला की, घरच्या संघाविरूद्ध खेळून हंगामाची सुरूवात करण्याचा आनंद वेगळाच आहे. प्रेक्षकांचा पाठिंबा हा त्यांनाच असेल, हे आम्हाला चांगलं माहित आहे. पण त्यामुळेच आम्हाला आणखी जास्त जोर लावण्याची प्रेरणा मिळते. असे सामने संपूर्ण हंगामाची दिशा ठरवणारे ठरतात. आम्ही प्रेक्षकांना एक रोमांचक सामन्याचा अनुभव देण्यासाठी सज्ज आहोत.

कबड्डी हा सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. हा देशाच्या प्रत्येक काना कोपऱ्यात खेळला जाणारा खेळ भारतीय सैन्याच्या संस्कृतीतही खोलवर रुजलेला आहे. हंगामाच्या आधीच पीकेएलने भारतीय सशस्त्र दलांना आदरांजली वाहिली आहे. आदरांजली वाहण्यासाठी 12 संघांचे कर्णधार आयएनएस कुरसुरा या पाणबुडीला भेट देण्यासाठी गेले होते. 1971 मध्ये झालेल्या भारत- पाकिस्तान युद्धात या पाणबुडीने गस्त मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती.

दरम्यान, प्रो कबड्डी लीगच्या 12 व्या हंगामाची सुरूवात विशाखापट्टणममध्ये 29 ऑगस्ट ते 11 सप्टेंबरदरम्यान होणार आहे. त्यानंतर लीगचे सामने जयपूर 12 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर, चेन्नई (29 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर) आणि नवी दिल्ली (11 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर) येथे खेळवले जातील. प्लेऑफ्स आणि अंतिम सामना कुठे होणार हे अजूनपर्यंत निश्चित झालेलं नाही.

Comments are closed.