हायकोर्टातील पाच खंडपीठांचे कामकाज ‘लाईव्ह’ पाहता येणार; थेट प्रक्षेपण सुविधेचे सरन्यायाधीशांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीचे थेट प्रक्षेपण करण्याच्या सुविधेचे शनिवारी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मागील काही वर्षांपासून वकिल तसेच पक्षकार या आॅनलाईन सुविधेची प्रतिक्षा करीत होते. या सुविधेच्या पहिल्या टप्प्यात पाच खंडपीठाचे कामकाज लाईव्ह पाहता येणार आहे. अर्थात पक्षकारांना कोणत्याही ठिकाणावरून त्यांच्या प्रकरणाची सुनावणी पाहता येणार आहे.
सुरुवातीला मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे, न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले, न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन, न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती मिलिंद साठ्ये, न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील या पाच खंडपीठांपुढील सुनावणीचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. येत्या सोमवारपासून नागरिकांना उच्च न्यायालयातील सुनावणी लाईव्ह पाहता येणार आहे.
शनिवारी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते या सुविधेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिपांकर दत्ता, न्यायमूर्ती अतुल चांदुरकर, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आदी मान्यवर उपस्थित होते. सरन्यायाधीशांच्या हस्ते उच्च न्यायालयातील मोफत वायफाय आणि इंटरनेट सुविधेचेही उद्घाटन करण्यात आले.
न्यायालयाचे कामकाज पाहायचे किंवा सुनावणी ऐकायची झाली तरी कोर्टाची पायरी चढावी लागते. त्यातही प्रकरणात पक्षकार असल्यास वारंवार न्यायालयाचे हेलपाटे मारावे लागतात. अशाप्रकारे न्यायालयात माराव्या लागणाऱ्या फेऱ्यांपासून आता सुटका होणार आहे.
Comments are closed.