अॅस्ट्रा एमके -1 क्षेपणास्त्राचे उत्पादन गती
लढाऊ विमानांचा ‘काळ’ अशी ओळख : भारत डायनॅमिक्स लिमिटेडने वाढविले उत्पादन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या विरोधात भारत कोणती सैन्य कारवाई करणार याची माहिती सध्या सर्वसामान्यांना नाही. परंतु ज्या आक्रमक प्रकारे भारत तयारी करतोय, ते पाहता दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानची धास्ती वाढली आहे. भयभीत पाकिस्तानने भारताच्या आक्रोशाचा शिकार होण्यापासून वाचण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेकडे विनंती केली आहे. तर दुसरीकडे भारताने लढाऊ विमानांचा काळ अशी ओळख असलेल्या अस्त्र एमके-1 क्षेपणास्त्रांच्या निर्मितीला मोठा वेग दिला आहे.
भारत सरकारकडे मालकी असलेली कंपनी भारत डायनॅमिक्स लिमिटेडने (बीडीएल) अस्त्र एमके-1 क्षेपणास्त्राचे उत्पादन वाढविले आहे. अस्त्र एमके-1 क्षेपणास्त्राचे उत्पादन वाढवत भारतीय वायुदलाच्या क्षेपणास्त्र भांडाराला वेगाने वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. अस्त्र एमके-1 ला लढाऊ विमानांचा काळ मानले जात असल्याने ही घडामोड अत्यंत महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे. हे भारताचे स्वदेशी क्षेपणास्त्र असून याकरता भारताला कुठल्याही अन्य देशावर निर्भर राहण्याची गरज नाही.
अस्त्र एमके-1 हे भारताचे स्वदेशी दृश्य सीमेच्या पलिकडे आकाशातून आकाशात मारा करणारे क्षेपणास्त्र (बीव्हीआरएएएम) असून ते 10 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरील हवाई लक्ष्यांचा भेद करू शकते. याच्या मदतीने दूरवरील हवाई क्षेत्राला नियंत्रित करण्याच्या भारताच्या क्षमतेत मोठी भर पडते. भारतीय सैन्याने अस्त्र एमके-1ला एकीकृत करण्यास सुरुवात केली असून वायुदल आणि नौदलाने देखील यावर काम सुरू केले आहे.
भारताची दोन लढाऊ विमाने सुखोई एसयु-30एमकेआय आणि तेजस लढाऊ विमानात देखील हे क्षेपणास्त्र जोडण्यात येते. यामुळे भारताची दूर अंतरावरील शत्रूच्या विमानांना नष्ट करण्याच्या क्षमतेत वाढ झाली आहे. सध्या भारतीय नौदल स्वत:च्या मिग-29 के लढाऊ विमानांवर अस्त्र एमके-1 चे उ•ाण परीक्षण करत आहे. बीडीएल सध्या दरवर्षी शेकडो अस्त्र एमके-1 क्षेपणास्त्रांचे उत्पादन करत आहे. ही वाढलेली उत्पादन क्षमता पुरेसा शस्त्रास्त्र भांडार राखण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, जेणेकरून उच्च तीव्रतायुक्त संघर्ष स्थितींदरम्यान आवश्यक क्षेपणास्त्रांना वेगाने बदलता येऊ शकेल.
अस्त्र एमके-1 भारताचे पहिले बियॉन्ड व्हिज्युअल रेंज एअर-टू-एअर मिसाइल असून ते डीआरडीओने विकसित केले आहे. हे क्षेपणास्त्र भारताच्या वायुशक्तीचा मजबूत स्तंभ ठरले आहे, खासकरून चीन आणि पाकिस्तानच्या धोक्यांसमोर याला अत्यंत प्रभावी मानले जाते. याचे सर्वात मोठे वैशिष्ट्या याची दीर्घ पल्ल्यापर्यंत मारा करण्याची क्षमता आहे. याचा मारक पल्ला 70-110 किलोमीटरदरम्यान आहे. म्हणजेच दृश्य सीमेबाहेर जात हे क्षेपणास्त्र शत्रूचे लढाऊ विमान किंवा ड्रोन नष्ट करू शकते.
या क्षेपणास्त्रात अॅक्टिव्ह रडार होमिंग सिकर असून तो क्षेपणास्त्राला अंतिम टप्प्यापर्यंत लक्ष्यावर लॉक करून ठेवतो. याचबरोबर फायर अँड फॉरगेट तंत्रज्ञान याला डागण्यात आल्यावर ऑटोमॅटिक क्षेपणास्त्राचे स्वरुप देते. अस्त्र एमके-1 4.5 मॅक म्हणजेच ध्वनिच्या वेगापेक्षा 4.5 पट अधिक वेग गाठत असल्याने शत्रूच्या विमानाला बचावाची फारशी संधी मिळत नाही. याचबरोबर हे क्षेपणास्त्र जॅमिंग आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेयरला सामोरे जाण्यास सक्षम आहे. यामुळे ते चीन आणि पाकिस्तानच्या ईसीएम सक्षम लढाऊ विमानांच्या विरोधात एक घातक अस्त्र ठरते. याचमुळे एसयू-30एमकेआय, मिग-29 युपीजी, तेजस एमके-1ए आणि भविष्यात राफेल आणि एएमसीए यासारख्या विमानांवर तैनात केले जाणार आहे.
Comments are closed.