स्मृतीगंध – अलौकिक तबला नवाज

>> प्रा. अनिल कवठेकर

तबलावादनाला जागतिक लौकिक प्राप्त करून देणारे व हा ताल रसिकांच्या हृदयांत भिनवणारे सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसेन यांचे नुकतेच निधन झाले. तबला वादन म्हणजे जणू त्यांची समाधी होती. इतक्या जलद गतीने, इतक्या वेगाने तबल्यावर पडणारी त्यांची बोटे आणि त्यातून निर्माण होणारा देदीप्यमान ध्वनी ऐकणाऱयाला मंत्रमुग्ध करून टाकत असे. हे साधण्याची किमया केवळ अलौकिक कलाकारच करू शकतात. त्या दृष्टीने झाकीर हुसेन हे एक अलौकिक तबला वादक होते.

कलाकाराच्या मृत्यूसमवेत त्याची विद्या कधीही नष्ट होत नाही. त्याचे सूर, त्याचे बोल आणि त्यामागील त्याच्या भावना आहेत तशाच आजही आपल्या सोबत शिल्लक असतात – उस्ताद झाकीर हुसेन.

झाकीर जन्माला आल्यानंतर जेव्हा त्यांना घरी हॉस्पिटलमधून आणले आणि त्यांच्या वडिलांच्या हातात दिले तेव्हा पहिल्यांदा वडिलांच्या तोंडून त्यांनी ताल ऐकला. त्यांच्या घराण्यात अशी परंपरा होती की, वडिलांनी जन्मलेल्या बालकाच्या कानात ईश्वराची प्रार्थना म्हणावी. त्यांचे वडील उस्ताद अल्लारखां यांनी झाकीरला जवळ घेतले. त्याच्या कानाजवळ आपले ओठ नेले आणि तबल्याचा एक ताल कानात सांगितला. त्यांच्या पत्नी म्हणाल्या, “अहो, तुम्ही हे काय करताय? तुम्ही प्रार्थना म्हणायला हवी त्याच्या कानात.’’

तेव्हा अल्लाहरखां म्हणाले, “हीच माझी प्रार्थना आहे. मी सरस्वती आणि गणेशाचा भक्त आहे.’’ ज्याच्या आयुष्याची सुरुवातच इतकी सुंदर झाली. तो एक जगप्रसिद्ध तबला वादक होणार हे नियतीने ठरवूनच टाकले होते.

लहानपणी त्यांना क्रिकेट खेळायला फार आवडत असे, पण वडिलांनी त्यांना कधीही क्रिकेट खेळू दिले नाही. त्यांनी अत्यंत कठोर शिस्तीत झाकीर यांना रियाज आणि रियाज याचेच वेड लावले. वडिलांच्या या कठोर शिस्तीतूनच ते तयार झाले.

झाकीर इतके जगप्रसिद्ध तबलावादक असूनही अत्यंत नम्र होते. स्वतचा तबला स्वत उचलून आणत. स्वतच वाद्य लावत. इतकेच नव्हे तर आपल्या सोबत साथ करणारा जर एखादा नवखा असेल तर त्यालाही ते कसे लावायचे हे अत्यंत मृदू भाषेत समजावून सांगत. त्याने काय करायला हवे म्हणजे त्याला यश मिळेल याचेही मार्गदर्शन करत. त्यांच्या शब्दांमध्ये कमालीचे मृदुत्व होते. त्यांचे तालवाद्यावरचे बोलणे म्हणजे एक आत्मानुभव होता. एखाद्या जगप्रसिद्ध वादकाने स्टेजवर कसे वागावे याचा वस्तुपाठ झाकीर यांनी घालून दिलेला आहे. स्टेजवर असणाऱया प्रत्येकाचा ते सन्मान करत. त्यांच्याशी आपलेपणाने बोलत. तो नवखा कलाकार असो की सहायक असो, त्याला प्रोत्साहन देत.

एका कार्यक्रमात त्यांच्यासमोर लावलेल्या दोन माईकपैकी एक माईक वारंवार खाली पडत होता. आपला ताल कुठेही बिघडू न देता त्यांनी त्याला अनेक वेळा उभा केला आणि या प्रत्येक वेळी त्यांच्या चेहऱयावर हास्य होते. विशेष म्हणजे त्यांचा ताल कुठेही बिघडला नव्हता. एका विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर माणूस आध्यात्मिक होतो. झाकीर यांचे तसेच झाले होते. त्यांच्या बोलण्यात प्रेम आणि डोळ्यांत करुणा होती.

तबला वादन म्हणजे जणू त्यांची समाधी होती. इतक्या जलद गतीने, इतक्या वेगाने तबल्यावर पडणारी त्यांची बोटे आणि त्यातून निर्माण होणारा देदीप्यमान ध्वनी ऐकणाऱयाला मंत्रमुग्ध करून टाकत असे. हे साधण्याची किमया केवळ अलौकिक कलाकारच करू शकतात. त्या दृष्टीने झाकीर हुसेन हे एक अलौकिक तबला वादक होते. ते एकमेव तबला वादक होते ज्यांनी सर्व प्रकारच्या कलाकार व कला प्रकारांबरोबर काम केले आहे. टप्पा, ठुमरी, झुला, अभंग, भजन, सोलो, फ्युजन, जॅझ… सगळ्या कला प्रकारांना आत्मसात करून तबला या वाद्याला देश-विदेशात मानाचे स्थान मिळवून देणारा व ध्रुवस्थानावर विराजमान झालेला असा हा अष्टपैलू कलाकार होता.

मला चाळीस वर्षांपूर्वीचा एक प्रसंग आठवतो. तेव्हा आमच्या कॉलेजमध्ये झाकीर हुसेन यांना बोलावले होते. कॉलेजचे मैदान केवळ विद्यार्थ्यांनी नाही तर शहरातल्या इतर लोकांनीही भरून गेले होते. त्यात काही रिक्षावले होते, काही टेम्पो ड्रायव्हर होते, काही फळवाले होते, काही विक्रेते होते आणि आजच्यासारखा त्याकाळी कुठे फ्लेक्स लावून जाहिरातही केलेली नव्हती. तरीही या लोकांना कसे कळले हा एक मोठा संशोधनाचा विषय ठरावा असा जनसमुदाय हजर होता. ज्यांना तबला म्हणजे काय हे सुद्धा माहीत नव्हते असे प्रेक्षक झाकीर हुसेन यांचा तबला ऐकण्यासाठी आले होते. अस्सल कलेचा सुगंध हा असाच अवकाशात पसरत असतो. परमेश्वर समजण्यासाठी जशी कोणत्याही मध्यस्थीची गरज नसते तशी अलौकिक कला समजण्यासाठी कोणत्याही इतर माध्यमांची गरज नसते हे झाकीर हुसेन यांच्या तबला वादनाने सिद्ध केले होते.

एकदा मुलाखत घेणाऱयाने त्यांना प्रश्न विचारला की, “तबला वादन करताना तुम्हाला कोणाची गंमत करावीशी वाटत नाही का?’’ तेव्हा झाकीर हुसेन यांनी जे उत्तर दिले त्यावरून आपल्याला त्यांच्या उच्च आध्यात्मिक पातळीची प्रचीती येईल. ते म्हणाले, “तबला वादन करताना मी दोन मात्रांच्या मधलं अवकाश शोधणं एवढंच काम करतो.’’ दोन मात्रांच्या मधले अवकाश जर आपण गणितात पाहिले तर ते काही सेकंदांचे असते. त्या दोन सेकंदांमधील तो अवकाश शोधणे हे केवळ अलौकिक चैतन्य असणारी व्यक्तीच करू शकते.

जेव्हा जेव्हा ताजमहालची आठवण येते, तेव्हा तेव्हा ताजमहाल समोर बसून तबला वादन करणारे झाकीर हुसेन आपल्या डोळय़ापुढे दिसतात आणि ते दोन शब्द आठवतात, “वाह उस्ताद नही, वाह ताज बोलिये!’’

जगभरातील लाखो करोडो रसिकांच्या हृदयात सामावलेले तबल्याचे ते बोल कधीही या भौतिक विश्वातून नाहीसे होणार नाहीत. झाकीर तुम्ही कालही होतात आणि आजही आमच्या हृदयात आहात अगदी तसेच तुमच्या त्या दिलखुलास हास्यासह…

(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)

Comments are closed.