आव्हानात्मक काळातही प्रगती चांगली आहे
व्यापार आणि उद्योग मंत्री गोयल यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सध्याच्या आव्हानात्मक जागतिक परिस्थितीतही भारताची आर्थिक प्रगती उत्तम प्रकारे होत आहे, असे आश्वासक प्रतिपादन केंद्रीय व्यापार आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केले आहे. शनिवारी येथे ते अमेरिकेच्या भारतासंबंधीच्या धोरणासंबंधी प्रतिक्रिया व्यक्त करीत होते. अमेरिकेने भारताकडून अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीतील काही वस्तूंवर 50 टक्के व्यापार शुल्क लागू केले आहे. त्यासंबंधी त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. अडचणीच्या काळातही आम्ही उत्कृष्ट सहनशक्ती दाखविली आहे, असे त्यांनी प्रतिक्रियेत स्पष्ट केले.
सध्याची जागतिक आर्थिक परिस्थिती अत्यंत अस्थिर आणि बेभरवशाची झालेली आहे. असे असूनही भारताची आर्थिक प्रगती इतक्या वेगाने होत आहे, की आंतरराष्ट्रीय नाणेनिधीलाही भारताच्या विकासदाराचे अनुमान 6.6 टक्क्यांपेक्षा अधिक वाढवावे लागले आहे. नुकतीच भारताने वस्तू-सेवा करप्रणालीत मोठी सुधारणा केली आहे. त्यामुळे आर्थिक विकासाला अधिकच गती मिळाली आहे. मात्र या सुधारणेचा अमेरिकेने लागू केलेल्या व्यापार शुल्काशी संबंध नाही. या प्रणालीत आवश्यक ती सुधारणा करण्यासंबंधी विचार अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वीपासून केला जात होता. त्यामुळे या सुधारणेचा व्यापार शुल्काशी संबंध नाही. या वित्तवर्षाच्या प्रथम तिमाहीत आमचा विकास दर 7.8 टक्के राहिला. गेल्या महिन्यात गेल्या आठ वर्षांमधील सर्वात कमी महागाई दर आम्ही साध्य केला. एस अँड पी या संस्थेने भारताचे रेटिंग गेल्या 18 वर्षांमध्ये प्रथमच वाढविले आहे. ही बाब अर्थव्यवस्थेचा भक्कमपणा सिद्ध करण्यास पुरेशी आहे. नुकत्याच संपलेल्या नवरात्र उत्सवाच्या पहिल्या आठ दिवसांमध्ये मारुती सुझुकी कंपनीने 1 लाख 65 हजार वाहनांची विक्री केली. वस्तू-सेवा कर प्रणालीत सुधारणा केल्याने मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Comments are closed.