तामिळनाडूमध्ये 4,400 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन
पुदुच्चेरीलाही पंतप्रधानांकडून 2,700 कोटींची भेट : मोदींनी काँग्रेस-द्रमुक सरकारवर साधला निशाणा
वृत्तसंस्था/ मदुराई
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी तामिळनाडूतील मदुराई येथे पोहोचले. येथे त्यांनी 4,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन केले. त्यांनी तामिळनाडूमध्ये आठ नव्याने बांधलेल्या अमृत भारत रेल्वेस्थानके आणि तीन नवीन ऑल इंडिया रेडिओ एफएम रिले ट्रान्समीटरचे उद्घाटन देखील केले. त्यानंतर मोदींनी सभेला संबोधित केले. देशाचे भविष्य घडवण्यात तामिळनाडू निर्णायक भूमिका बजावेल, असे पंतप्रधान म्हणाले. याचदरम्यान मोदींनी पुदुच्चेरीत 2,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुदुच्चेरीच्या भेटीदरम्यान विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी त्यांनी पुद्दुचेरीला भेट देणे हा त्यांच्यासाठी सन्मानाचा विषय असल्याचे आणि ही संत, कवी आणि स्वातंत्र्यसैनिकांची भूमी असल्याचे सांगितले. महान कवी सुब्रमण्यम भारती यांनी या भूमीतून राष्ट्रवादाची भावना जागृत केली होती, अशी आठवण त्यांनी करून दिली. काँग्रेस-द्रमुक राजवटीत पुद्दुचेरीच्या लोकांना खूप त्रास सहन करावा लागला. त्यांच्या कारकिर्दीत राजकीय अस्थिरता, भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि गरिबांच्या दु:खाने भरलेली होती. रेशन दुकानांमध्ये तांदळाची कमतरता होती, पगार उशिरा होत होते आणि गुंड, ड्रग्ज माफिया राज्य करत असल्याचे आरोप पंतप्रधानांनी केले.
‘विकसित तामिळनाडू’ हा आमचा ध्यास
2047 पर्यंत प्रत्येक भारतीयाला विकसित राष्ट्र निर्माण करण्याची प्रेरणा आहे. देशाचे भविष्य घडवण्यात तामिळनाडू निर्णायक भूमिका बजावेल. विकसित भारतासाठी विकसित तामिळनाडू हे आमचे सामूहिक ध्येय आहे. केंद्र सरकार राज्याचा समावेशक विकास आणि प्रगती सुनिश्चित करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. तामिळनाडू अनेक उद्योगांचे घर आहे आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारच्या अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत. 2047 पर्यंत प्रत्येक भारतीय देशाच्या विकासात योगदान देत आहे. तामिळनाडू देखील यामध्ये वेगाने योगदान देत आहे. तामिळनाडूला समृद्ध इतिहास आणि वारसा आहे. आदिचनल्लूर सारखी ऐतिहासिक स्थळे जागतिक वारसा स्थळे म्हणून विकसित केली जातील, असे आश्वासनही पंतप्रधानांनी दिले.
भारतीय रेल्वेमध्ये ऐतिहासिक परिवर्तन
गेल्या दशकात भारतीय रेल्वेमध्ये ऐतिहासिक परिवर्तन झाले आहे. ती एक आधुनिक, कार्यक्षम आणि लोककेंद्रित वाहतूक व्यवस्था म्हणून उदयास येत आहे. हे परिवर्तन विशेषत: तामिळनाडूमध्ये दिसून येते. आमचे सरकार सत्तेत आल्यापासून तामिळनाडूसाठी रेल्वे अर्थसंकल्पातील वाटप जवळजवळ नऊ पटीने वाढले आहे. 2009 ते 2014 पर्यंत रेल्वेसाठी सरासरी वार्षिक वाटप 880 कोटी होते. 2026-27 मध्ये, हे वाटप 7600 कोटी रुपयांपर्यंत वाढल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.
रेडिओ स्टेशनचे उद्घाटन आनंददायी
आजपासून तुमच्या सेवेत असलेल्या ऑल इंडिया रेडिओ रेडिओ स्टेशनचे उद्घाटन करताना मला खूप आनंद होत आहे. राज्याच्या पायाभूत सुविधा निधीत तिप्पट वाढ करण्यात आली आहे. गेल्या दशकाच्या तुलनेत ही लक्षणीय वाढ आहे. अर्थसंकल्पात रेअर अर्थ कॉरिडॉरसाठी राज्याला निधीही देण्यात आला आहे. तामिळनाडूचा समृद्ध इतिहास आहे. तामिळनाडूमध्ये पायाभूत सुविधांसाठी वाटप करण्यात आलेला निधी गेल्या दशकाच्या तुलनेत तिप्पट वाढला आहे. यामुळे प्रगत उत्पादन, संशोधन आणि तांत्रिक विकासाला चालना मिळेल, असा आशावाद पंतप्रधानांनी व्यक्त केला.
Comments are closed.