तिरुपती विमानतळाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव
भगवान वेंकटेश्वराच्या नावाने ओळखणार? : ‘टीटीडी’चा विमान वाहतूक मंत्रालयाला प्रस्ताव
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आंध्रप्रदेशातील तिरुपती येथील रेणीगुंता विमानतळाचे नाव ‘श्री व्यंकटेश्वर आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे बदलण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानमचे (टीटीडी) अध्यक्ष बी. आर. नायडू यांनी बुधवारी यासंबंधीची माहिती देताना नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे शिफारस पाठवण्यात आल्याचे स्पष्ट केले.
रेणीगुंता विमानतळाचे नाव भगवान श्री व्यंकटेश्वराच्या नावाने बदलण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. हे विमानतळ तिरुमलाच्या दैवी सौंदर्याचे प्रतिबिंबित करेल. तिरुमलामधील आध्यात्मिक आणि भक्तीमय वातावरण प्रतिबिंबित करण्यासाठी विमानतळाची पुनर्बांधणी केली जाणार असल्याचेही नायडू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्याव्यतिरिक्त मंदिरात दान स्वरुपात आलेल्या तूप, पाणी आणि इतर वस्तूंची गुणवत्ता तपासण्यासाठी मंदिर संस्था तिरुपतीमध्ये जागा भाड्याने घेणार असल्याचेही सांगण्यात आले.
श्रीवारी मंदिर बांधण्याची योजना
कर्नाटक सरकारकडून जमीन वाटप होईपर्यंत टीटीडीने बेंगळूरमधील एका प्रमुख ठिकाणी श्रीवारी मंदिर बांधण्याची योजना देखील आखली आहे. शाश्वत वाहतुकीला चालना देण्यासाठी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री कुमारस्वामी यांनी टीटीडीला 100 इलेक्ट्रिक बस देण्यास सहमती दर्शविली आहे.
Comments are closed.