सरकारचे पाप; किल्ले रायगडाच्या पायरी मार्गावरील संरक्षक भिंत ‘धारातीर्थी’, बांधकाम खात्याच्या कामाची पोलखोल
‘धारातीर्थी’ पडली आहे. खोके सरकारच्या लाडक्या कंत्राटदाराने दौलतजादा कमावण्यासाठी पुरातत्व विभागाचे नियम पायदळी तुडवून काम केल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप शिवप्रेमींनी केला आहे. त्यामुळे हे सरकारचेच पाप असून बांधकाम खात्यातील दोषी अधिकारी आणि ठेकेदाराच्या या ‘भ्रष्टाचारी कटकारस्थाना’ची चौकशी करा, अशी मागणी होत आहे.
रायगड किल्ल्यावर ‘शिवकालीन पद्धतीने’ पुनर्बाधणी, जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे. मात्र या कामांमध्ये निकृष्ट दर्जा, अकार्यक्षम देखरेख आणि अपारदर्शक प्रक्रियेबाबत अनेकदा शंका व्यक्त करण्यात आल्या आहेत. अशातच आता नव्याने बांधलेल्या पायरी मार्गावरील संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळल्याने संताप व्यक्त होत आहे. पायरी मार्गावरील ही संरक्षक भिंत सार्वजनिक बांधकाम खात्याने काही वर्षांपूर्वी बांधली होती. निकृष्ट बांधकामामुळेच ही भिंत ढासळल्याचा आरोप होत असून शिवभक्तांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
सुदैवाने जीवितहानी टळली
घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झाली नसली तरी भविष्यातील धोका लक्षात घेता या संपूर्ण कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी होत आहे. रायगडावर दररोज हजारो पर्यटक, शिवभक्त, अभ्यासक आणि ट्रेकर्स येत असतात. त्यासाठी किल्ल्यावरील बांधकामाचा दर्जा आणि सुरक्षिततेचे उपाय हे अत्यंत काटेकोर असणे गरजेचे असतानाच नव्याने बांधलेली संरक्षक भिंत कोसळल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे
अधिकाऱ्यांना लाज कशी वाटत नाही?
ऊन, वारा, पाऊस अंगावर घेऊन किल्ले रायगड गेली साडेतीनशे वर्षे सोनेरी इतिहासाची साक्ष देत उभा आहे. मात्र नव्याने बांधलेली भिंत कोसळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. भिंत पाण्याच्या लोंढ्यामुळे कोसळल्याचा दावा एका अधिकाऱ्याने करून स्वतःचे पाप झाकण्याचा प्रयत्न केला आहे. यावरून शिवप्रेमींनी अधिकाऱ्यांना लाज कशी वाटत नाही असे खडे बोल सुनावले आहेत.
Comments are closed.