दिंडोरा प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन; आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले, दडपशाहीचा तीव्र निषेध व्यक्त

चंद्रपूर जिल्ह्यातील दिंडोरा बॅरेज प्रकल्पाला शेतकऱ्यांनी विरोध सुरू केला आहे. संपादित जमिनीचा मोबदला आजच्या दराने द्यावा, यासाठी प्रकल्पग्रस्त शेतकरी आंदोलन करीत आहेत. पोलिसांनी अखेर दडपशाही करत आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या या दडपशाहीचा आंदोलक शेतकऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात वर्धा नदीवर दिंडोरा बॅरेज बांधला जात आहे. या प्रकल्पासाठी चंद्रपूरसह यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील शेती संपादित करण्यात आली. दहा वर्षांपूर्वी या प्रकल्पासाठी लागणारी जमीन संपादित करताना त्यावेळच्या दरानुसार शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आला. त्यानंतर 2018 मध्ये पुन्हा हेक्टरी साडेतीन लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले. सध्या प्रकल्पाचे 60 टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम सुरू आहे. या प्रकल्पामुळे तिन्ही जिल्ह्यातील 22 गावातील सुमारे दहा हजार हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. मात्र, या संपादित जमीनीचा आजच्या दराने मोबदला द्यावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
अतिशय कमी दरात आमच्या जमिनी घेण्यात आल्याने चालू दरानुसार पाचपट रक्कम म्हणजे 240 कोटींचे पॅकेज आम्हाला द्यावे, अशी मागणी या आंदोलक शेतकऱ्यांची आहे. ही मागणी पूर्ण केल्यास संपूर्ण राज्यात हा पायंडा पडेल आणि कोणतेही प्रकल्प शक्य होणार नाही, अशी भूमिका शासनाने या शेतकऱ्यांपुढे मांडली. शासनाची ही भूमिका फेटाळून शेतकऱ्यांनी आज काम बंद पाडत धरणे आंदोलन केले. त्यामुळे जलसंपदा विभागाला पोलिसांचा आधार घ्यावा लागला. पोलिसांनी या सर्व आंदोलकांना प्रकल्पाजवळून हटवले आहे. त्यामुळे आंदोलक चांगलेच संतापले. शांततेच्या मार्गाने सुरू असलेले आंदोलन दडपण्याचा हा प्रयत्न असून, अशा दडपशाहीला न जुमानता आम्ही पुन्हा आंदोलन करू, असा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे. आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
Comments are closed.