चाबकाने मारहाण करून निषेध नोंदवला

वृत्तसंस्था/ कोइम्बतूर

तामिळनाडूतील अण्णा विद्यापीठाच्या एका विद्यार्थिनीवर बलात्कार प्रकरणी विरोधी पक्षांकडून निदर्शने सुरू आहेत. याप्रकरणी संताप व्यक्त करत भाजप प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी द्रमुक सरकारला हटवेपर्यंत  अनवाणी पायांनी फिरणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच पीडित विद्यार्थिनीला न्याय मिळवून देण्याची मागणी करत स्टॅलिन सरकारच्या निषेधार्थ स्वत:ला चाबकाचे फटके मारून घेतले आहेत. बलात्काराचा आरोपी हा द्रमुकचा पदाधिकारी असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर द्रमुकने हा आरोप फेटाळला आहे.

तत्पूर्वी अण्णामलाई यांनी आरोपी अन् द्रमुक नेत्यांची एकत्र असलेली छायाचित्रे सादर केली होती. यामुळे द्रमक चांगलाच अडचणीत आला आहे. आरोपी हा द्रमुकचा पदाधिकारी असल्याने पोलिसांनी त्याच्या विरोधात कारवाई केली नसल्याचे अण्णामलाई यांनी म्हटले आहे.  पीडितेने तक्रार केल्यावरही पोलिसांनी कारवाई करणे टाळले होते. परंतु संबंधित प्रकरण सोशल मीडियावर चर्चेत आल्यावर पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केल्याने लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आरोपी ज्ञानशेखरनवर यापूर्वीच 10 गुन्हे नोंद आहेत तरीही पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली नव्हती असे समोर आले आहे. तर आरोपी ज्ञानशेखरने पीडित विद्यार्थिनीला बलात्कारानंतर धमकाविले होते, असे समोर आले आहे.

चेन्नईतील बलात्कार प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली आहे. आयोगाने तामिळनाडूचे पोलीस महासंचालक शंकर जीवाल यांना पत्र लिहून आरोपीच्या विरोधात भारतीय दंड संहिता 2023 मधील कलम 71 लागू करण्याची सूचना केली आहे. संबंधित आरोपी हा वारंवार गुन्हे करणारा असून यापूर्वीही त्याने अशाप्रकारचे गुन्हे आहेत. त्याच्या विरोधात नोंद सर्व गुन्ह्यांचा तपास बंद करण्यात आला होता, असे निदर्शनास आले असल्याचे आयोगाने स्वत:च्या पत्रात नमूद पेले आहे.

Comments are closed.