पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करणे चुकीचे आहे.

सोनम वांगचुक यांच्या पत्नी काँग्रेस नेते राहुल गांधींवर भडकल्या

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

नीट पेपरफुटीच्या विरोधात सातत्याने उपोषण करणाऱ्या सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली आंग्मो यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर शाब्दिक हल्ला चढविला आहे. पंतप्रधान कार्यालयाबाहेर जात आंदोलन करणे चुकीचे होते. राहुल गांधींनी जंतर-मंतर येथे जात विद्यार्थ्यांसोबत बसणे अपेक्षित होते. राहुल गांधी यांचे हे कृत्य म्हणजे ‘नॉन सिंसियर’ असल्याची टीका गीतांजली यांनी केली आहे. राहुल गांधी आता लोकांची दिशाभूल करण्याचे काम करू शकत नाहीत असे गीतांजली यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. आम आदमी पक्षाने त्यांच्या या मुलाखतीचा व्हिडिओ शेअर केला आहे.

पंतप्रधान निवासस्थानाच्या बाहेर झालेले आंदोलन हे पूर्णपणे देखाव्यादाखल होते. जर विद्यार्थ्यांसाठी हेतू स्पष्ट असता तर राहुल गांधी हे जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांसोबत उभे ठाकले असते. जनता आता अशा ड्राम्याला बळी पडणार नसल्याचा दावा आम आदमी पक्षाने केला आहे. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी चिंता करणारा प्रत्येक पक्ष अन् व्यक्तीसोबत आम्ही आहोत. पीएमओ बाहेर आंदोलनात प्रामाणिकतेचा अभाव होता. जर या मुद्द्यावर राहुल प्रामाणिक असते, तर ते जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांसोबत उभे ठाकले असते. राहुल गांधी लोकांना मूर्ख करू पाहत आहेत. परंतु हा जागा झालेला भारत असल्याचे गीतांजली यांनी म्हटले आहे.

भाजपकडून देखील लक्ष्य

केंद्रीय मंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी बुधवारी रात्री पत्रकार परिषद घेत सरकारची  स्थिती स्पष्ट करण्यासोबत काँग्रेसला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. राहुल यांनी पंतप्रधान निवासस्थानाच्या बाहेर जात आंदोलन केल्यावर सरकार आणि विरोधी पक्षांमधील संघर्ष वाढला आहे. राहुल गांधींचा उद्देश विद्यार्थ्यांचे हित नाही, विद्यार्थ्यांना लाभ मिळावा, शिक्षणाची गुणवत्ता सुधारावी यात गांधींना स्वारस्य नाही, ते केवळ राजकीय पोळी भाजू पाहत असल्याची टीका नड्डा यांनी केली.

Comments are closed.