पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत द्या
दोन राज्यांचे पंतप्रधान मोदी यांच्याकडून सर्वेक्षण
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
वर्षा आणि पूर यामुळे हाहाकार उडालेल्या पंजाब आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमधील, तसेच देशातील इतरही पूरग्रस्त भागांमधील आपदाग्रस्त जनतेला जास्तीत जास्त साहाय्य केंद्र सरकारकडून दिले जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्यांनी मंगळवारी पंजाब आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमधील पूरग्रस्त भागाचे हेलिकॉप्टरमधून सर्वेक्षण केले. तसेच, अधिकाऱ्यांकडून पूर आणि अतिवृष्टीने झालेल्या हानीची माहिती घेतली. पूरग्रस्तांना आवश्यक ते सर्व साहाय्य करण्याच्या सूचना आपण अधिकाऱ्यांना केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अतिवृष्टी आणि पुरामुळे या दोन राज्यांमध्ये, तसेच देशाच्या अन्य भागांमध्येही शेतकरी वर्गाची मोठी हानी झाली आहे. लक्षावधी एकर भूमीतली शेती अतिवृष्टीमुळे वाया गेली आहे. त्यामुळे आता या शेतकऱ्यांना सरकारखेरीज कोणाचाही आधार उरलेला नाही. सरकारला या स्थितीची जाणीव असून सरकार लवकरात लवकर आपद्ग्रस्तांना साहाय्य देणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली. त्यांनी हिमाचल प्रदेशसाठी 1 हजार 500 कोटीचे पॅकेजही घोषित केले आहे.
जनजीवन रुळावर आणण्यासाठी प्रयत्न
पूर आणि अतिवृष्टी यांच्यामुळे पंजाब आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये जनजीवन अस्ताव्यस्त झाले आहे. लक्षावधी लोक बेघर झाले असून त्यांची रोजगाराची साधनेही गमावली गेली आहेत. या राज्यांमधील जनजीवन पुन्हा सुरळीत करण्यासाठी बहुविध उपाययोजना आवश्यक असून ती करण्यासाठी संबंधित राज्यसरकारांशी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी केंद्र सरकारची चर्चा होत आहे. लवकरात लवकर एक बहुपेडी योजना घोषित केली जाईल आणि तिचे कार्यान्वयनही त्वरित केले जाईल, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.
मंत्रिमंडळ अंतर्गत समिती
पंजाब आणि हिमाचल प्रदेशात परिस्थितीची प्रत्यक्षात पाहणी करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अंतर्गत एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती दोन्ही राज्यांमधील पूरग्रस्त भागांना प्रत्यक्ष भेटी देऊन हानीचे सर्वेक्षण करणार आहे. त्यानंतर त्वरित समिती आपला अहवाल सादर करेल. त्या अहवालाच्या आधारावर केंद्र सरकार साहाय्याचे पॅकेज घोषित करणार आहे.
हिमाचलसाठी 1,500 कोटीचे पॅकेज
हिमाचल प्रदेशमध्ये पूर आणि अतिवृष्टी यांच्यामुळे 4 हजार 12 कोटी रुपयांची हानी झाली आहे. राज्यात 6 हजार 344 घरे, 461 दुकाने आणि अनेक कारखाने नष्ट झाले आहेत. तसेच, 370 लोकांचा बळी गेला आहे. 619 मार्ग वाहून गेले असून वीजेचे असंख्य खांब आणि इतर सुविधा वाहून गेल्या आहेत. केंद्र सरकारने या राज्यासाठी प्राथमिक निधी म्हणून 1 हजार 500 कोटी रुपयांचे पॅकेज घोषित केले आहे. ही रक्कम या राज्याला त्वरित दिली जाणार आहे.
बालिकेची केली चौकशी
हिमाचल प्रदेशात एका 1 वर्षाच्या बालिकेची चौकशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन केली. या बालिकेच्या मातापित्यांचा पुरात मृत्यू झाल्याने ती अनाथ झाली आहे. सध्या तिचे योगक्षेम एका अनाथालयात पाहिले जात आहे. या बालिकेचे सर्व उत्तरदायित्व सरकारच्या वतीने घेतले जाईल, अशी घोषणा तिचे योगक्षेम पाहणाऱ्या अनाथालयाला भेट देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
पर्यावरणस्नेही विकासाची आवश्यकता
हिमालयाच्या सान्निध्यात असणाऱ्या राज्यांचा विकास पर्यावरणन्सेही पद्धतीने झाला पाहिजे, असे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संबंधात एका तज्ञ समितीची स्थापना करावी आणि अशा विकासाचे प्रारुप निश्चित करावे, अशी मागणी होत आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदरसिंग यांनीही अशी मागणी केली असून आपण ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर करणार आहोत, असे प्रतिपादन त्यांनी केले. हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये दरडी कोसळून मोठ्या प्रमाणावर हानी यावेळी झालेली आहे.
बहुपेडी साहाय्याची आवश्यकता
ड पूरग्रस्त भागांमधील जनजीवन सुरळीत करण्यासाठी बहुपेडी योजना
ड हिमाचल प्रदेशसाठी 1,500 कोटी रुपयांच्या पॅकेजची त्वरित घोषणा
ड पंजाबमध्ये शेतीची मोठ्या प्रमाणात हानी, केंद्र सरकार साहाय्य देणार
ड केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अंतर्गत समिती स्थापन करुन प्रत्यक्ष सर्वेक्षण
Comments are closed.