पीएसएलमध्ये चेंडूशी छेडछाड! फखर जमानची कृती कॅमेरात कैद, आफ्रिदीची रिऍक्शनही पाहा

पाकिस्तान क्रिकेट आणि वाद यांचे एक अतूट नाते आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. सध्या सुरू असलेल्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये (पीएसएल) पाकिस्तानी खेळाडूंनी चेंडूशी छेडछाड केल्याच्या आरोपामुळे एका नव्या वादाला सुरूवात झाली आहे. हे लाहोर कलंदर्स आणि कराची किंग्ज या सामन्यादरम्यान घडले आणि वादामध्ये लाहोरचा फखर जमान अडकला आहे.

जेव्हा कराचीला विजयासाठी १४ धावांची आवश्यकता होती आणि लाहोरकडून शेवटचे षटक वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ टाकणार होता, तेव्हा हे घडले. रौफ षटक टाकण्याची तयारी करत होता, तेव्हा कर्णधार शाहीन शाह आफ्रिदी आणि फखर त्याच्यासोबत चर्चा करत काही योजना आखताना दिसले. त्यावेळी फखर चेंडूशी छेडछाड करत असल्याचे कॅमेरात कैद झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

त्यानंतर मैदानावरील पंच फैजल आफ्रिदी आणि बांग्लादेशचे सहकारी पंच शरफुद्दला यांनी त्यांच्याकडून चेंडू मागवला आणि काही चर्चा केली. त्यामध्ये असा निष्कर्ष काढला गेला की चेंडूमध्ये मुद्दाम काही बदल करण्यात आला होता आणि लाहोरला त्याची शिक्षाही मिळाली. पंचांनी कराचीला पाच पेनाल्टी धावा दिल्या. त्यामुळे सहा चेंडूत ९ धावांचे लक्ष्य झाले. तसेच तो चेंडूही बदलण्यात आला.

कराचीचा फलंदाज खुशदिल शाह शेवटच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला, त्यानंतर रौफने एक वाईड चेंडू टाकला. अब्बास आफ्रिदीने तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि मग षटकार मारत १९.३ षटकात कराचीला विजय मिळवून दिला. हा सामना त्यांनी ४ विकेट्सने जिंकला.

सामन्यानंतर झालेल्या प्रकरणात पाकिस्तान क्रिकेट बोर्डने एक निवेदन सादर केले. त्यामध्ये सांगितले गेले की, शिस्तभंगाच्या सुनावणीवेळी फखरने त्याच्यावरील आरोप फेटाळले असून पुढील ४८ तासांत आणखी एक सुनावणी होणार तेव्हा योग्य निकाल दिला जाईल. दोषी आढळल्यास लेव्हल ३ गुन्ह्यासाठी किमान एका सामन्याची बंदी आहे.

Comments are closed.