पाकिस्तानात राडा, पीएसएलचा खेळ खंडोबा! दिग्गज खेळाडूंनी फिरवली पाठ; आता बांगलादेश क्रिकेट बोर्ड

BCB ने PSL 2026 साठी बांगलादेशच्या खेळाडूंना क्लियर केले: पाकिस्तान सुपर लीग (PSL) 26 मार्चपासून सुरू होणार असून, या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) अखेर मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपल्या खेळाडूंना परवानगी दिली आहे. मात्र, यंदाची स्पर्धा प्रेक्षकांविना रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवली जाणार आहे.

पीएसएलमध्ये खेळण्यास हिरवा कंदील (Bangladesh players greenlit for PSL)

बीसीबीने याबाबत दिलेल्या अधिकृत निवेदनात सांगितले की, पाकिस्तानमधील सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी युवा व क्रीडा मंत्रालय तसेच परराष्ट्र मंत्रालयाशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर खेळाडूंच्या सुरक्षेबाबत कोणतीही चिंता नसल्याची खात्री झाल्यानंतरच त्यांना पीएसएलमध्ये खेळण्यास हिरवा कंदील देण्यात आला.

बीसीबीने पुढे स्पष्ट केले की, पाकिस्तानकडून मिळालेल्या ठोस आश्वासनांनंतर त्यांच्या खेळाडूंनी स्पर्धेसाठी पाकिस्तानकडे रवाना होण्यास सुरुवात केली आहे. “आमच्या खेळाडूंची सुरक्षा आणि कल्याण हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे,” असेही बोर्डाने ठामपणे नमूद केले.

पीएसएल स्पर्धा रिकाम्या स्टेडियममध्येच होणार (PSL 2026 to Be Played in Empty Stadiums)

दरम्यान, पश्चिम आशियातील सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे यंदाची पीएसएल स्पर्धा रिकाम्या स्टेडियममध्येच खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, इंधन टंचाईमुळे प्रवासावर मर्यादा घालण्याचे आवाहन पंतप्रधानांकडून करण्यात आले असल्याची माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी दिली.

यामुळे आधी 6 वेगवेगळ्या मैदानांवर होणारे सामने आता फक्त दोनच ठिकाणी लाहोर आणि कराची येथे खेळवले जाणार आहेत. याशिवाय, उद्घाटन समारंभही रद्द करण्यात आला आहे. बांगलादेशच्या खेळाडूंमध्ये मुस्ताफिझुर रहमान लाहोर कलंदर्सकडून खेळणार असून, त्याच्यासोबत परवेज हुसैन इमोनही त्याच संघात दिसणार आहे. तर शोरिफुल इस्लाम, नाहिद राणा आणि तंजीद हसन तमीम हे पेशावर जल्मीचे प्रतिनिधित्व करतील. रिशाद हुसैन रावलपिंडी संघाकडून मैदानात उतरणार आहे. या सर्व खेळाडूंना बीसीबीने यापूर्वीच एनओसी (अनापत्ती प्रमाणपत्र) दिले होते.

दिग्गज खेळाडूंनी फिरवली पाठ

दरम्यान, अनेक विदेशी खेळाडू पाकिस्तान सुपर लीगमधून माघार घेत असल्याने स्पर्धा अडचणीत आली आहे. त्यामुळे यंदाची पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा अनेक अडचणींमध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दासुन शनाका याने लाहोर कलंदर्स संघ सोडून आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. तर ब्लेसिंग मुझरबानी हा कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणार आहे. त्यामुळे पाकिस्तान सुपर लीगला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

हे ही वाचा –

IPL 2026 : ‘डॅडीज आर्मी’ ते यंग ब्रिगेड… आयपीएलचा नवा सीझन आणि नवी चेन्नई सुपर किंग्स!

आणखी वाचा

Comments are closed.