कुंभवडे-सागवे येथील बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाची जनसुनावणी स्थागित; शिवसेना आणि स्थानिकांच्या विरोधाला यश
राजापूर तालुक्यातील कुंभवडे-सागवे परिसरातील प्रस्तावित बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांसह शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तीव्र विरोध दर्शवला होता. सुनावणी घेतल्यास ती उधळवून लावण्याचा इशारा शिवसेनेने दिला होता. याला यश आले असून बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाची २० आणि २८ मे रोजी होणारी सुनावणी स्थगित करण्यात आली आहे.
कुंभवडे-सागवे परिसरातील १४४.९५ हेक्टर क्षेत्रावर ०.९ दशलक्ष टन क्षमतेचा बॉक्साईट उत्खनन प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पामुळे कोकणच्या पर्यावरण आणि जनजीवनावर विपरीत परिणाम होणार आहेत.आंबा आणि काजू बागायतींचे नुकसान होणार आहे. नैसर्गिक जलस्त्रोत बाधित होऊन पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. उत्खननातून पसरण्याऱ्या धुळीमुळे श्वसनाचे आजार व त्वचारोग पसरू शकतात. त्यामुळे ग्रामस्थांनी बॉक्साईट प्रकल्पाला विरोध केला होता. शिवसेनेनेही (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाला विरोध करून जनसुनावणी घेतल्यास ती उधळवून लावण्याचा इशारा दिला होता. ग्रामस्थ आणि शिवसेनेच्या तीव्र विरोधामुळे सोमवारी जिल्हा प्रशासनाने २० आणि २८ मे रोजी होणारी बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाची जनसुनावणी स्थगित केली आहे.
Comments are closed.