योजनांचा लाभ जनतेला थेट आणि सहज मिळावा!
पंतप्रधानांची सूचना : कॅबिनेट मंत्र्यांसोबत साडेतीन तास बैठक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी दिल्लीतील भारत मंडपम येथे संपन्न झाली. ही महत्त्वपूर्ण बैठक सुमारे साडेतीन तास चालली. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी सर्व विभागांच्या मंत्र्यांना विशिष्ट सूचना दिल्या. त्यांनी मंत्र्यांना सर्व योजनांच्या केंद्रस्थानी जनतेला ठेवून काम करण्याचे आवाहन केले. देशातील लोकांना सर्व सरकारी योजनांचे लाभ थेट आणि सहजपणे मिळतील याची खात्री करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले पाहिजे, अशी सक्त सूचना केली. तसेच यापूर्वीच्या बैठकीत तयार केलेल्या योजनेवर पंतप्रधानांनी सर्व मंत्र्यांचे वैयक्तिक अभिप्रायही घेतले.
पंतप्रधान मोदींनी फिलिपाईन्सच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावरून नवी दिल्लीत परतल्यानंतर काही तासांतच मंत्र्यांची महत्त्वाची बैठक घेतली. त्यांनी 16-17 नोव्हेंबर रोजी फिलिपाईन्सची राजधानी मनिला येथे झालेल्या 49 व्या आसियान शिखर परिषदेत भाग घेतला होता. विदेशातून परतल्यानंतर लगेचच झालेली ही संपूर्ण मंत्रिमंडळाची पहिली बैठक होती. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी मागील बैठकीपासून मंत्र्यांनी केलेल्या प्रगतीचा आणि प्रलंबित कामांचा आढावा घेतला. तसेच त्यांनी योजनांच्या प्रगतीचाही आढावा घेत भविष्यातील धोरणासोबतच सरकारच्या प्रमुख प्राधान्यक्रमांवर चर्चा केली.
सप्टेंबरमध्ये झालेल्या चिंतन शिबिरादरम्यान मंत्र्यांना सोपवलेल्या उद्दिष्टांवर आणि जबाबदाल्यांवर आतापर्यंत झालेल्या प्रगतीचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. तीन महत्त्वाच्या सादरीकरणांमध्ये सरकारचे प्राधान्यक्रम आणि दारिद्र्या निर्मूलनसारख्या प्रमुख योजनांच्या स्थितीवर चर्चा झाली. सरकारी योजनांचे लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचावेत आणि सुशासनाची उद्दिष्ट्यो केवळ कागदावरच मर्यादित राहू नयेत, हे सुनिश्चित करणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता.
अमली पदार्थविरोधी मोहिमेवरही चर्चा
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमली पदार्थांच्या गैरवापराविरोधात कठोर मोहीम राबवण्याचे आवाहन केले. या विषयावरील चर्चेदरम्यान पंतप्रधान भावूक झालेले दिसले. देशाला आणि देशातील तरुणांना अमली पदार्थांच्या विळख्यातून कोणत्याही परिस्थितीत वाचवलेच पाहिजे, असे त्यांनी बैठकीत स्पष्ट केले.
बैठकीच्या केंद्रस्थानी ‘विकसित भारत 2047’
या महत्त्वपूर्ण बैठकीत ‘विकसित भारत 2047’च्या आराखड्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. सप्टेंबरमध्ये ‘चिंतन शिबिर’ म्हणून आयोजित केलेल्या मंत्रिमंडळाच्या मागील बैठकीतही ‘विकसित भारत 2047’वर भर देण्यात आला होता. त्या बैठकीनंतर, ‘व्हिजन – 2047’साठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन आराखडे तयार करण्याकरिता सचिवांचे 10 क्षेत्रीय गट तयार करण्यात आले. विविध हितधारकांशी व्यापक सल्लामसलतही करण्यात आली. बुधवारच्या बैठकीत या आराखड्याच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
Comments are closed.