पुजाराने वाचवली टीम इंडियाची शान! जाणून घ्या त्याच्या कारकिर्दीतील खास कामगिरी

चेतेश्वर पुजाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. पुजाराने 2010 मध्ये टीम इंडियाकडून कसोटी पदार्पण केले होते आणि त्यानंतर तो भारतीय कसोटी फलंदाजी क्रमाचा महत्त्वाचा भाग बनला. गेल्या 2 वर्षांपासून पुजारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता आणि आता त्याने आपल्या कारकिर्दीचा शेवट केला आहे. आपल्या ऐतिहासिक कसोटी करिअरमध्ये पुजाराने अनेक अविस्मरणीय खेळी करून टीम इंडियाची लाज वाचवली आहे.

2021 च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत भारत 1-1 अशी बरोबरीत होता. तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने टीम इंडियासमोर 407 धावांचे लक्ष्य ठेवले. सामना ड्रॉ करायचा असेल, तर भारताला तब्बल 131 षटके फलंदाजी करावी लागणार होती. या सामन्यात पुजाराने आपल्या कारकिर्दीतील सर्वात लक्षात राहील अशी खेळी केली. त्याने 205 चेंडू खेळून 77 धावा केल्या. पॅट कमिन्स आणि जोश हेजलवूड यांच्या तुफानी बाऊन्सर्सचा त्याने धैर्याने सामना केला. शारीरिक वेदना असूनही तो ठाम उभा राहिला. त्याला हनुमा विहारीची साथ मिळाली. या जोरावर टीम इंडियाने 97 षटके फलंदाजी केली आणि सामना ड्रॉ केला. त्यामुळे भारत पराभव होण्यापासून वाचला.

2015 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत भारत 1-1 अशी बरोबरीत होता. मालिका जिंकायची असेल तर भारताला शेवटचा सामना जिंकणे गरजेचे होते. टीम इंडियाने पहिली फलंदाजी केली आणि चेतेश्वर पुजाराने अप्रतिम खेळी केली. मात्र, त्याला कुठल्याही टॉप ऑर्डर फलंदाजाचा साथ मिळाला नाही. अमित मिश्राने 59 धावा केल्या. पुजारा सलामीला आला आणि त्याने 289 चेंडूत नाबाद 145 धावा ठोकल्या. श्रीलंकन गोलंदाज त्याला बाद करूच शकले नाहीत. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने 312 धावा केल्या. पुजाराच्या या खेळीने टीमला आत्मविश्वास दिला आणि भारताने 117 धावांनी विजय मिळवला. या सामन्यातील खेळीने पुजाराने स्वतःला सिद्ध करून दाखवले.

2018 मध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची सुरुवात एडलेडमध्ये झाली होती. पहिल्याच सामन्यात चेतेश्वर पुजाराने 246 चेंडूत दमदार 123 धावा ठोकल्या. त्याच्याशिवाय इतर कोणताही फलंदाज 40 धावांचाही टप्पा ओलांडू शकला नाही. भारताने एका टप्प्यावर फक्त 19 धावांवर 3 गडी गमावले होते, पण पुजाराच्या खेळीच्या जोरावर टीमने 250 धावा केल्या. दुसऱ्या डावातही त्याने 71 धावा केल्या. त्याच्या या दोन्ही खेळींमुळे भारताने 31 धावांनी विजय मिळवला. पुजाराने मालिकेत भारताला आघाडी मिळवून दिली आणि शेवटी त्याचाच फायदा झाला. टीम इंडियाने मालिका 2-1 ने जिंकली. या खेळीमुळे पुजाराला आधुनिक काळातील भारताचा ‘द वॉल’ ही उपाधी मिळाली.

Comments are closed.