भरधाव हायवाने दुचाकीला उडवले; पतीचा जागीच मृत्यू, पत्नी जखमी

मोरगाव-सुपा-चौफुला या अष्टविनायक महामार्गावर दौंड तालुक्यातील पडवी हद्दीत भीषण अपघाताची घटना घडली. खडीने भरलेल्या भरधाव वेगाने जाणाऱ्या हायवा वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर मागे बसलेल्या महिलेला गंभीर मार लागल्याने ती जखमी झाली, अशी माहिती पाटस पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी दिली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बारामती शहरात झालेला हायवाने दुचाकीला चिरडल्याची घटना घडली होती. त्याचीच पुनरावृत्ती आज पडवी येथे झाली.

गबाजी भीमाजी कोळपे (वय 65, रा. वाई, जि. सातारा) यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला असून, त्यांच्या पत्नी अलका गबाजी कोळपे (वय 60) या गंभीर जखमी झाल्या आहेत.

आज सकाळी 10 ते 12 वाजण्याच्या सुमारास सुपा-चौफुला रस्त्यावर पडवी गावाकडे जाणाऱ्या फाट्याजवळ ही अपघाताची घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अष्टविनायक मार्गावरील कुसेगाव बाजूने ओव्हरलोड दगडी खडी भरून येणाऱ्या डंपर हायवा (एमएच-42, टी-1128) या वाहनाने सुपे बाजूकडून येणाऱ्या दुचाकीला (एमएच-11, सीटी-5709) जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकी खाली पडली. मात्र, हायवा वाहन अंगावरून गेल्याने दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक संजय जगदाळे, पोलीस हवालदार गणेश मुटेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, पोलिसांनी हायवा वाहन ताब्यात घेतले असून, चालकावर गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे तपास करत आहेत.

Comments are closed.