Pune crime news – दौंडमध्ये आईनेच घोटला दोन चिमुरड्यांचा गळा, पतीवरही कोयत्याने हल्ला

कौटुंबिक कारणातून आईनेच आपली अडीच वर्षांची मुलगी आणि एक वर्षाच्या मुलाचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावात शनिवारी घडली. दोन मुलांची हत्या केल्यानंतर महिलेने झोपेत असलेल्या पतीवर कोयत्याने हल्ला केला. यात पती जखमी झाला आहे. आईनेच दोन मुलांची हत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात शोककळा पसरली. याप्रकरणी महिलेला दौंड पोलिसांनी अटक केली आहे.

पियू दुर्योधन मिंढे (वय अडीच), शंभू दुर्योधन मिंढे (वय एक वर्ष) अशी या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत. याप्रकरणी कोमल दुर्योधन मिंढे (वय – 30) हिला अटक करण्यात आली आहे. कोयत्याच्या हल्ल्यात पती दुर्योधन आबासाहेब मिंढे (वय – 36) हे जखमी झाले असून, त्यांच्यावर बारामतीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दुर्योधन मिंढे एका आयटी कंपनीत अभियंता आहेत. सध्या ते घरातून काम करतात. मिंढे कुटुंबीय स्वामी चिंचोली गावातील शिंदे वस्ती भागात राहायला आहेत. शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास कोमलने ओढणीने पियू आणि शंभू यांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर गाढ झोपेत असलेल्या दुर्योधन यांच्यावर कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. दुर्योधन यांनी आरडाओरडा केला असता, दुर्योधन यांचे आई-वडील, भाऊ झोपेतून जागे झाले. जखमी अवस्थेतील दुर्योधन यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच, दौंडचे उपविभागीय अधिकारी बापूराव दडस, पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, सहायक निरीक्षक नागनाथ पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. दौंड पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Comments are closed.