प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

महानगरपालिका निवडणुकीत अजित पवार गटाबरोबर हातमिळवणी करण्याच्या राष्ट्रवादीच्या निर्णयावरून दोन दिवसांपूर्वी पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादीची साथ सोडली होती. त्यानंतर जगताप यांनी आज मुंबईत येऊन
काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

मुंबईत टिळक भवन येथे झालेल्या कार्यक्रमात प्रशांत जगताप यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी माजी मंत्री नसीम खान, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, मोहन जोशी, युवक काँग्रेस अध्यक्ष शिवराज मोरे,  प्रवत्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष जगताप यांना अनेक पक्षांचे आमंत्रण असतानाही त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करणे पसंत केले. महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जगताप यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश हा काँग्रेसला बळ देणारा आहे.

लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात पण जगताप वैचारिक लढ्यासाठी काँग्रेस पक्षात आले – हर्षवर्धन सपकाळ

काँग्रेस पक्षाला विचारांचा वारसा आहे. समता, बंधुता, सामाजिक न्याय या मूल्यांसाठी काँग्रेसचा लढा आहे. तर दुसरीकडे जातीवादी मनुवादी विचारांचा भाजप पक्ष आहे. भाजपाची भूमिका ही केवळ मूठभर लोकांच्या हाती राजसत्ता व धर्मसत्ता असावी अशी आहे. काही लोकांना काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार, सर्व पदे दिली; पण त्यांची घुसमट होते म्हणून ते काँग्रेस पक्ष सोडून गेले. लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढय़ासाठी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Comments are closed.