Pune GBS Outbreak water in 55 places is unsafe for drinking in marathi
पुणे : पुण्यामध्ये गुएलेन बॅरी सिंड्रोमचा (GBS) मोठा उद्रेक झाल्याचे समोर आले आहे. नांदेडगाव परिसरात झालेल्या या उद्रेकामुळे राज्यभर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशामध्ये या परिसरातील पाण्याचे नमुने रासायनिक आणि जैविक तपासणीसाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. यापैकी 55 ठिकाणचे पाण्याचे नमूने दुषित असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या अहवालातून ते पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे निष्पन्न झाले आहे. या दरम्यान, जीबीएसच्या रुग्णसंख्येतील वाढ सुरूच असून, एकूण रुग्णसंख्या 184 वर पोहोचली आहे. (Pune GBS Outbreak water in 55 places is unsafe for drinking)
आरोग्य विभागाने जीबीएसचे रुग्ण आढळून आलेल्या परिसरामधील पाण्याचे नमुने आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठवले होते. नांदेडगाव परिसरात जीबीएसचा उद्रेक झाल्यामुळे तेथील सर्वाधिक नमुने होते. या पाण्याच्या नमुन्यांची रासायनिक तसेच जैविक तपासणी राज्य आरोग्य प्रयोगशाळेने केली. एकूण 4 हजार 761 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 55 पाण्याचे नमुने दूषित असल्याची निरीक्षणातून आढळून आले. ते पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा निष्कर्ष प्रयोगशाळेने काढला आहे. पिण्यास अयोग्य आढळलेले सर्व नमुने नांदेड गाव परिसरातील आहेत, अशी
माहिती समोर आली आहे.
पुणे महानगरपालिकेकडून नांदेडगाव परिसरातील चिकनचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत (एनआयव्ही) पाठवण्यात आले आहेत. याचसोबत अन्न औषध प्रशासनाने नांदेड गाव परिसरातील हॉटेलमधून खाद्यपदार्थांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठवले आहेत. तसेच, रुग्णसंख्या जास्त असलेल्या भागात आरोग्य विभागाकडून रुग्णांचे सर्वेक्षण सुरू आहे. पुणे महापालिकेने 46 हजार 534 घरांचे सर्वेक्षण केले. पिंपरी-चिंचवड महापालिकेने 24 हजार 883 आणि पुणे ग्रामीणने 13 हजार 291 अशा एकूण 84 हजार 708 घरांचे सर्वेक्षण केले. राज्यामध्ये पुणे विभागात जीबीएसचे सर्वाधिक 176 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये पुणे महापालिका 37, महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेली गावे 89, पिंपरी-चिंचवड महापालिका 26, पुणे ग्रामीण 24 आणि इतर जिल्ह्यांमधील 8 अशी रुग्णसंख्या आहे. आतापर्यंत जीबीएसमुळे 6 जणांचा मृत्यू झाला. तर, जीबीएसच्या 47 रुग्णांवर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत.
Comments are closed.