हिमाचलचे सफरचंद यंदा सफाचट! हिमाचलच्या सफरचंदाला हवामानाचा घाला! उत्पादनात ७० टक्के घट; महिनाभरातच हंगाम आटोपणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

प्रतिकूल हवामानाचा मोठा फटका यंदा हिमाचल प्रदेशातील सफरचंद उत्पादनाला बसला असून, उत्पादनात तब्बल ७० टक्क्यांची घट झाली आहे. गेल्या १५ ते २० वर्षांतील हा सर्वांत खराब हंगाम ठरण्याची शक्यता असून, दरवर्षी अडीच महिने चालणारा हिमाचलचा सफरचंद हंगाम यंदा अवघ्या महिनाभरातच, म्हणजे सप्टेंबरअखेर आटोपणार आहे. उत्पादन घटल्याने आवक कमी झाली असून, त्याचा परिणाम बाजारातील दरांवरही झाला आहे.

दरवर्षी जुलैअखेर हिमाचलच्या सफरचंदाची आवक सुरू होते. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हंगाम सुरू राहतो. मात्र, यंदा हवामानातील बदलांमुळे लो-हाईट भागातील सफरचंदाचे मोठे नुकसान झाले. या भागातील माल आता संपत आला असून, त्यातील तब्बल ९० टक्के सफरचंद अत्यंत लहान आकाराचे पिट्टू निघाले आहेत. सध्या मिडल-हाईटचा हंगाम सुरू असून, २० ते २५ ऑगस्टनंतर पुढील १५ ते २० दिवस त्याची आवक राहणार आहे. त्यानंतर हाय-हाईट भागातील सफरचंद बाजारात येईल. मात्र, एकूण उत्पादनच मोठ्या प्रमाणात घटल्याने हा हंगाम सप्टेंबरअखेर संपण्याची शक्यता आहे. हिमाचलमधील सफरचंदाची प्रमुख बाजारपेठ असलेल्या पिंजोर मंडीत दररोज चार ते पाच लाख पेट्यांची आवक होत असते. यंदा मात्र ही आवक अवघ्या ७० ते ८० हजार पेट्यांवर आली आहे. त्यातही केवळ २० टक्के माल उच्च दर्जाचा, तर ८० टक्के माल सरासरी गुणवत्तेचा असल्याची माहिती मार्केटयार्डातील सफरचंदाचे ज्येष्ठ अडतदार करण जाधव यांनी दिली.

मोठ्या कंपन्यांनी थेट बागेत जाऊन ए ग्रेड दर्जाचा माल खरेदी सुरू केल्याने घाऊक बाजारात सध्या दुय्यम दर्जाच्या सफरचंदाची आवक अधिक होत आहे. गुलटेकडी मार्केटयार्ड फळबाजारात हिमाचलच्या सफरचंदाच्या दररोज सुमारे १५०० ते २००० पेट्यांची आवक होत आहे. २४ ते २५ किलोच्या बॉक्सला प्रतवारीनुसार २ हजार ते ४ हजार रुपये, तर चांगल्या मालाला २५०० ते ४ हजार रुपये दर मिळत आहे. किरकोळ बाजारात सफरचंद २०० ते २२५ रुपये किलो दराने विकले जात आहे. कश्मीरमधील गाला सफरचंदाची आवक यंदा वेळेआधीच सुरू झाली आहे. दररोज २५०० ते ३००० पेट्यांची आवक होत असून, आकार व गुणवत्तेत एकसारखा असलेल्या या सफरचंदाला ग्राहकांची पसंती मिळत आहे. ८ ते ९ किलोच्या ६० नगांच्या पेटीला सुमारे १८०० रुपये, १४.५ ते १५ किलोच्या १०५ नगांच्या पेटीला २१०० ते २२०० रुपये, तर १२० नगांच्या पेटीला १८०० ते २००० रुपये दर मिळत आहे.

  • यंदा हिमाचलमध्ये हवामानातील बदलांमुळे उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे यंदाचा हंगाम नेहमीपेक्षा खूपच कमी राहणार आहे. मात्र, काश्मीरच्या गाला सफरचंदाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

बागेपासून पुण्यात अवघ्या पाच दिवसांत!

हिमाचल आणि काश्मीरमधील देशी सफरचंद तोडणीनंतर अवघ्या पाचव्या दिवशी पुण्याच्या बाजारात दाखल होते. त्यामुळे त्याचा ताजेपणा आणि चव टिकून राहते. याउलट परदेशातून आयात होणार्‍या सफरचंदाला ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी दोन ते सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो. टिकवणुकीसाठी आयातीत सफरचंदावर वॅक्सिंग तसेच अन्य प्रक्रिया केली जाते. त्यामुळे ताजेपणाच्या बाबतीत देशी सफरचंदाला ग्राहकांची पसंती मिळत असल्याचे अडतदार करण जाधव यांनी सांगितले.

Comments are closed.