पुण्यातील जैन हॉस्टेलचा भूखंड लाटण्याचा डाव, जैन समुदायाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

पुण्यातील मॉडेल कॉलनीतील एचएनडी जैन वसतिगृहाची जमीन एका बिल्डरला विकण्याच्या प्रयत्नामुळे वाद निर्माण झाला आहे. साडेतीन एकरांचा हा भूखंड 230 कोटी रुपयांना विकण्याचा घाट घालण्यात आला असून यामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांचा हात असल्याची चर्चा पुण्यात आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात जैन समुदाय आणि माजी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढला.

मिळालेल्या माहितीनुसार, माजी विद्यार्थी व विश्वस्त यांच्यात कायदेशीर वाद सुरू आहेत. जमिनीचा वाद आणि पुनर्विकासाच्या प्रस्तावावर समाज आणि ट्रस्टमध्ये मतभेद आहेत. वसतिगृहाची जमीन एका बिल्डरला विकण्याच्या प्रयत्नावर माजी खासदार राजू शेट्टी, माजी विद्यार्थी आणि जैन समाजाने तीव्र आक्षेप घेतला आहे. राज्यभरातील जैन समाज, जैन हॉस्टेलचे माजी विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने जमीन विक्रीच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढला. यामध्ये माजी खासदार राजू शेट्टी हे देखील सहभागी झाले आहेत.

हा सार्वजनिक ट्रस्ट असून समाजाच्या हितासाठी या जागेचा वापर व्हावा, अशी मागणी होत आहे. जमीन विकण्याच्या ट्रस्टच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामध्ये पुण्यातील बडे बिल्डर आणि राजकीय नेते तसेच केंद्रीय राज्यमंत्री यांचाही सहभाग असल्याची चर्चा सुरू आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही गंभीर आरोप केले आहेत.

पुराव्यांसह रस्त्यावर उतरू, रोहित पवारांचा इशारा

‘पुण्यातील जैन धर्मियांची मोक्याची तब्बल साडेतीन एकर जागा अनेक कटकारस्थाने करून हडपली गेली असून यामध्ये आर्थिक लाभासाठी सरकारमधील काही नेत्याचाच हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात असून काही नेत्यांचे नातलगही यामध्ये पार्टनर असल्याचं कळतंय. इतर वेळेस स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या या लोकांनी धंदा आणि पैशासाठी जैन मंदिरही गिळंकृत केलं. सत्तेचा वरदहस्त असेल तर फाईली किती वेगाने पळतात हे नवी मुंबईत सिडको प्रकरणात दिसलंच तसं या प्रकरणातही दिसतंय. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन जैन बांधवांना न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी जैन मंदिराची जमीन हडपणाऱ्यांविरोधात आम्ही जैन बांधवांच्या लढ्यात सोबत आहोत. सरकारनेही यात हस्तक्षेप करुन त्यांना त्यांना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा या प्रकरणाचे सर्व पुरावे आमच्याकडे असल्याने आम्ही या पुराव्यांसह रस्त्यावर उतरू’, असा इशारा रोहित पवार यांनी दिला.

Comments are closed.