पुण्याजवळ भल्या पहाटे पाटण गावावर दरडीचा घाला; स्फोटासारखा आवाज झाला आणि घरे खचली, ढिगाऱ्याखाली एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

काळजाचा थरकाप उडवणाऱ्या ‘माळीण’ दुर्घटनेची आठवण देणारी घटना आज पुण्यातील मावळ तालुक्यात घडली. येथील पाटण गावावर भल्या पहाटे दरडीचा घाला पडला. अतिवृष्टीमुळे विसापूर किल्ल्याचा एक भाग कोसळून त्याच्या ढिगाऱ्याखाली एकाच कुंटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. तर गावातील अनेक घरे खचली. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

पुणे जिह्यात गेल्या तीन दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. मावळ तालुक्यात पावसाचा जोर जास्त आहे. पावसाच्या माऱ्यामुळे सोमवारी पहाटे विसापूर किल्ल्याचा एक भाग खचला. एखाद्या स्फोटासारखा आवाज होऊन हा खचलेला भाग निसटला आणि तो थेट नंदू दत्तू तिकोणे यांच्यावर घरावर कोसळला. काही क्षणात संपूर्ण घर दरडीखाली गाडले गेले. घरात असलेले नंदू तिकोणे, अनिता तिकोणे आणि त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर तिकोणे दरडीखाली अडकले. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांसह प्रशासकीय यंत्रणांनी तेथे धाव घेतली. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पथकही गावात पोहोचले. सर्व यंत्रणांच्या समन्वयातून मोठय़ा प्रयत्नांनंतर ढिगारा हटवण्यात आला व तिकोणे कुटुंबातील तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

तिकोणे यांच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने पहाटे चार वाजता तिकोणे यांचे घर पाहिले होते. फक्त त्यानंतर पाच मिनिटांत अचानक मोठय़ा स्फोटाचा आवाज झाला. त्या स्फोटानंतर पाहिले तर तिकोणे यांचे घर गहाळ झाले होते. ते दरडीखाली गेले होते.

Comments are closed.