अजित पवार गटाचे आमदार ज्ञानेश्वर कटकेंच्या मर्सिडीजनं 4 वर्षीय चिमुकलीला उडवलं, प्रकृती गंभीर

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या भरधाव मर्सिडीजने 4 वर्षांच्या चिमुकलीला धडक दिली. या अपघातामध्ये चिमुकली गंभीर जखमी झाली असून तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी दुपारच्या सुमारास पुणे-अहिल्यानगर महामार्गावर शिरूरच्या बोऱ्हाडेमळा येथे हा अपघात झाला. शुभ्रा पंढरीनाथ बोऱ्हाडे (वय – 4) असे गंभीर जखमी झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.
राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून प्रचाराच्या तोफा थंडावण्यास अवघे काही तास बाकी आहेत. त्यामुळे प्रचाराची घाई सुरू आहे. याच घाईतून शिरूर येथे हा अपघात झाला. अपघातानंतर आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी स्वत:च्या गाडीतून जखमी चिमुकलीला रुग्णालयात दाखल केले.
आमदार ज्ञानेश्वर कटके हे वाघोलीहून शिरूरकडे त्यांच्या काळ्या रंगाच्या मर्सिडीज कारमधून जात होते. शिरूरच्या बोऱ्हाडेमळा येथील हुंदाई शोरूमसमोर शुभ्रा बोऱ्हाडे ही चिमुकली रस्ता ओलांडत होती. अचानक ती समोर आल्याने आमदार कटके यांच्या चालकाने करकचून ब्रेक दाबला मात्र वेग जास्त असल्याने गाडीची चिमुरडीला धडक बसली आणि ती अक्षरश: चेंडूसारखी उडाली. अपघातात ती गंभीर जखमी झाली असून तिला उपचारांसाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Comments are closed.