Pune news – भाजप पदाधिकाऱ्याकडून नदीपात्रात पुन्हा होर्डिंग, पालिकेची परवानगी; राज्यमंत्र्यांच्या आशीर्वादाची चर्चा

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार टिळक चौकात संभाजी पोलीस चौकीच्या मागे नदीपात्रातील बेकायदा होर्डिंग पाडून टाकल्यानंतर आता पुन्हा याठिकाणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून होर्डिंग उभारणीचे काम सुरू झाले आहे. या होर्डिंगबाबत चौकशीसाठी गेलेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दादागिरी करून हुसकावून लावल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. दरम्यान, संबंधित भाजपच्या पदाधिकाऱ्यांना राज्यमंत्र्यांचा आशीर्वाद असल्याची चर्चा आहे. एकीकडे भाजपचे मंत्री अनधिकृत होर्डिंग न लावण्याचे आवाहन करतात आणि दुसरीकडे भाजप पदाधिकारीच दंडेलशाहीने होर्डिंग उभारत असल्याचे चित्र आहे.

शासनाच्या आकाशचिन्ह नियमावलीनुसार शासकीय जागेत, नदीपात्रात होर्डिंग उभारण्यास बंदी आहे. या नियमाचे उल्लंघन करून कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत संभाजी पोलिस चौकीच्या मागे होर्डिंग उभारण्यात आले होते. याविरोधात तक्रारी आल्यानंतर महापालिकेने यापूर्वी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी चुकीची परवानगी दिल्याने दोन कर्मचाऱ्यांना निलंबितही केले होते. तत्कालीन अतिरिक्त आयुक्तांनी जागा पाहणी करून याचा सविस्तर अहवाल आयुक्तांना सादर केला होता. याप्रकरणी न्यायालयातही याचिका दाखल झाली होती. त्यात महापालिकेच्या बाजूने निकाल लागला. त्यानंतर फेब्रुवारी २०२३ मध्ये हे होर्डिंग पाडून टाकण्यात आले होते. यानंतर आता या ठिकाणी पुन्हा होर्डिंग उभारणी करण्याचे काम सुरू झाले आहे.

दरम्यान, याठिकाणी होर्डिंगचे काम सुरू झाले असले तरी न्यायालयीन प्रक्रियेबाबत महापालिकेचे अधिकारी अंधारात होते. आम्ही नवीन आलो आहोत, त्यामुळे आम्हाला जास्त माहिती नसून माहिती घेत असल्याचे आकाशचिन्ह विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

याबाबत महापालिकेच्या विधी सल्लागार अॅड. निशा चव्हाण म्हणाल्या, ‘याठिकाणी होर्डिंग उभारण्याबाबत न्यायालयाने परवानगी दिली असल्याबाबत महापालिकेला कोणतीही माहिती नाही.’

“मी अशाप्रकारे कोणत्याही होर्डिंगला परवानगी दिलेली नाही. काम थांबविण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर दादागिरी केल्यामुळे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे.”

– पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त, महापालिका.

आता कमिश्नर आला तरी माघार घेत नसतो

कोणीही असेल तर लेखी घेऊन ये आणि पहिले कोर्टात दे. या विषयात मी मागे सरकणार नाही. मी कोणाला घाबरत नसतो. कमिश्नर आले तरी मी माघार घेत नसतो. काम थांबविण्याचे आदेश लेखी आदेश घेऊन यायचे. कोर्टाची ऑर्डर असताना तू कारवाई तर कर, असा इशारा देत भाजप पदाधिकाऱ्याने पालिकेच्या कर्मचाऱ्यांना तेथून हुसकावून लावले. तसेच आपल्याकडे न्यायालयाच्या परवानगीची ऑर्डर असल्याचे सांगत असले तरी ती दाखवली नसल्याचे व्हायरल व्हिडीओमधून दिसत आहे.

Comments are closed.