Pune News – कोथिंबिरीचे भाव घसरले; संतप्त शेतकऱ्याने उभ्या पिकात शेळ्या-मेंढ्या सोडल्या
बाजारात पालेभाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्याने कोथिंबीर आणि मेथी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. कोथिंबिरीला मिळणारा बाजारभाव इतका कमी झाला आहे की, काढणी, जुड्या बांधणी आणि वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने नागापूर येथील काही शेतकऱ्यांनी वैतागून उभ्या कोथिंबिरीच्या पिकात शेळ्या-मेंढ्या सोडल्या.
आंबेगाव तालुक्यातील कोथिंबीर उत्पादकांना सध्या कमी बाजारभावाचा मोठा फटका बसत आहे. अल्प कालावधीत तयार होणाऱ्या पालेभाज्यांमधून चांगले उत्पन्न मिळेल, या अपेक्षेने शेतकरी कोथिंबीर, मेथीची लागवड करतात. मात्र, बाजारात आवक वाढली की दरात मोठी घसरण होत असल्याने उत्पादन खर्च आणि मिळणारे उत्पन्न यामध्ये मोठी तफावत निर्माण होत आहे.
कोथिंबिरीची काढणी करण्यासाठी मजुरी, त्यानंतर जुड्या बांधणे, बाजार समितीपर्यंत वाहतूक आणि विक्रीसाठी होणारा अन्य खर्च यामुळे शेतकऱ्याच्या हातात फारसे काही शिल्लक राहत नाही. माल बाजारात नेल्यानंतर अपेक्षित भाव मिळाला नाही, तर उलट वाहतूक आणि काढणीचा खर्चही पदरमोड करून करावा लागतो. त्यामुळे उभे पीक ठेवायचे की काढून बाजारात पाठवायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
“कोथिंबीर विक्रीतून काढणी आणि वाहतुकीचा खर्चही निघत नाही. कष्ट करून पीक घेऊनही उत्पादन खर्च वसूल होत नसेल तर शेती कशी करायची? त्यामुळे वैतागून उभ्या कोथिंबिरीच्या पिकात शेळ्या-मेंढ्या सोडाव्या लागल्या,” अशी व्यथा नागापूर येथील कोथिंबीर उत्पादक शेतकरी दत्तात्रय वाघ यांनी व्यक्त केली.
एकीकडे बियाणे, खते, औषधे, पाणी, मजुरी आणि वाहतुकीचा खर्च सातत्याने वाढत आहे, तर दुसरीकडे तयार मालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने पालेभाजी उत्पादकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. पालेभाज्यांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत किमान योग्य भाव मिळावा, बाजारातील आवक व दराबाबत प्रभावी नियोजन करावे आणि शेतमालाची नासाडी टाळण्यासाठी प्रक्रिया व पर्यायी विक्री व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
किरकोळ बाजारात कोथिंबीर पाच रुपयांची
किरकोळ बाजारात सध्या कोथिंबिरीची एक जुडी अवघ्या पाच रुपयांना विकली जात आहे. या दरात उत्पादन, काढणी आणि वाहतुकीचा खर्चही भरून निघणे कठीण असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. मेथीची आवक कमी असल्याने तिची एक जुडी १५ ते २० रुपये दराने विकली जात आहे. यापूर्वी कोथिंबिरीची एक जुडी ३० ते ५० रुपये दराने विकली गेल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.
Comments are closed.